आपणांपासून सर्व भूतमात्रे निघाली पण आपण मात्र त्यांच्यांत नाही हा वरवर न पटणारा विचार स्पष्ट करण्यासाठी भगवंत आणखी दृष्टांत देतात. आणि अर्जुनाच्या मनाची समजूत घालतात. भूतसृष्टीच्या निर्मितीचे, स्थितीचे आणि लयाचे मला काहीच करावे लागत नाही. प्रजेला राजा असला की प्रजा आपले व्यवहार करीत असते, त्याप्रमाणे मी सर्वत्र आहे. याचा अर्थ मी त्यांच्यांत आहे असा नाही. लाेखंडाचा तुकडा चुंबकाने ओढला जाताे पण येथे चुंबकाला काही प्रयास पडतात का? बीजाला पाने व ुले येण्याची शक्ती भूमीतच आहे.त्याप्रमाणे ही भूतसृष्टी प्रकृतीच्या स्वाधीन आहे. स्थावरजंगम, स्थूलसूक्ष्म या सर्व सृष्टीला प्रकृतीच कारण आहे. म्हणून ही भूतसृष्टी निर्माण करणे अथवा तिचे पालन करणे अशा कर्माचे कर्तृत्व माझ्याकडे येत नाही.
पाण्यात चंद्राचा प्रकाश पसरलेला असताे. पण ताे विस्तार चंद्राने केलेला नसताे. चंद्रामुळे झालेला असताे हे खरे असेल, त्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य माझा आणि कर्माचा संबंध जाेडताे. पण मी असंग असल्यामुळे माझा त्याच्याशी संबंध नसताे.धुराच्या कणांचा समूह वाहत्या वाऱ्याला थांबवू शकेल काय? सूर्यबिंबात अंधार कधी प्रवेश करू शकेल काय? पावसाच्या धारा पर्वताच्या आतील भागात शिरतील काय? ह्याचप्रमाणे प्रकृतींमुळे झालेला कर्मसमूह माझ्याकडून हाेत नाही. तरी खरे पाहिले असता असे आहे की, कार्यरूप भूतसृष्टीत माझ्यावाचून दुसरी वस्तूच नाही. असे असले तरी मी तेथे उदासीन आहे. मी काहीच करीत नाही किंवा करवीत नाही. घरातील दिवा फक्त साक्षी असताे.