पत्र तेहतिसावे
आई चिंता करताे विश्वाची। आईला या मुलांची खराेखरच चिंता वाटू लागली.आईचेच अंत:करण ते. तिला वाटलं- याचं लग्न केलं म्हणजे हा सुधारेल.आई त्याला म्हणाली- ‘‘नारायणा, माझ्यासाठी तू लग्नाला उभा रहा, नाही म्हणू नकाेस.’’ नारायणाने आईचं म्हणणे कबूल केले.वय वर्षे बारा. नारायणाचे लग्न ठरले. खूप लाेक जमले.अंतरपाट धरला गेला. भटजी मंगलाष्टके म्हणू लागले. प्रत्येक मंगलाष्टकाच्या शेवटी - ‘सावधान’ हा शब्द जाेरात उच्चारण्यात आला.नानासाहेब देव म्हणतात- ‘समर्थ लग्नमंडपातून पळून गेले. असला चमत्कार आधी झाला नाही.’ खरं आहे ते म्हणणे लग्नमंडपातून पळून जाण्याचा चमत्कार काेणी केला नाही. हल्लीच्या काळीसुद्धा असला चमत्कार झालाच, तर वर वधूसकट पळून जाईल!! समर्थ मात्र एकटेच पळाले व शके 1542 च्या चैत्र शुद्ध प्रतिपदेस पंचवटीस रामापुढे येऊन उभे राहिले.
पंचवटीस रामाचे दर्शन घेऊन समर्थांनी बारा वर्षेपुरश्चरण करण्याचा संकल्प केला व त्यासाठी जवळच तपाेवनाच्या पलीकडे गाेदावरीच्या काठी टाकळी म्हणून गाव आहे तेथे राहण्याचे त्यांनी ठरवल बारा वर्षे तप करून आत्मारामाची भेट झाल्यावर समर्थांनी पुढील बारा बर्षे तीर्थाटन केले.भारतामध्ये समर्थ खूप ठिकाणी हिंडले. अंबेजाेगाईपासून ते निघाले ते थेट आपल्या जन्मगावी जांब येथे आले व आपल्या दारात येऊन माेठ्याने म्हणालेजय जय रघुवीर समर्थ.आतून उत्तर आले नाही.यावेळी समर्थांचे वय बत्तीस वर्षाचे हाेते. घर साेडून वीस वर्षाचा काळ लाेटला हाेता. समर्थाच्या मातेचे रडून रडून डाेळे गेले हाेते. नारायण आज येईल. उद्या येईल.
म्हणून त्या माऊलीने वाट पाहिली हाेती, पण तिच्या पदरी निराशाच आली हाेती. समर्थांनी बाहेरून पुन्हा म्हटलेजय जय रघुवीर समर्थ तरी आतून उत्तर नाही.समर्थांनी तिसऱ्यांदा म्हटलेजय जय रघुवीर समर्थ.समर्थांची माता सूनबाईस (गंगाधरच्या बायकाेस) म्हणाली - ‘अगं, बाहेर काेणी गाेसावी ओरडताे आहे. त्याला मूठभर भिक्षा नेऊन घाल.’ आईचे ते बाेलणे ऐकून समर्थ जाेरात म्हणाले - ‘हा गाेसावी भिक्षा घेऊन परत जाणार नाही.’ समर्थांच्या मातेच्या मनात एकदम वाटले - हा नारायण असेल का? ब्रह्मानंद वाटून ती माऊली म्हणाली - ‘काेण? माझा नारायण आला की काय?’