अर्जुनाच्या मनातील संमाेह दूर करण्यासाठी भगवान सांगतात की, यापूर्वी हाेऊन गेलेले सर्व प्राणी व वर्तमानकाळी असणारे सर्व प्राणी यांच्यांत सर्वत्र मीच आहे आणि पुढे जे प्राणी निर्माण हाेतील तेही माझ्यापासून वेगळे असणार नाहीत. अशा रीतीने सर्व विश्वात मीच भरलाे असताना जीवाला माझ्यावाचून वेगळे विश्व का वाटते? याचे कारण असे की, अनेकदा देह व अहंकार यांचे प्रेम जमते व त्यांना इच्छा नावाची मुलगी हाेते.ही कन्या विषयवासनारूपी तारुण्यदशेला येते व द्वेषाशी तिचा विवाहसंबंध हाेताे. असा पुरुष असंताेषरूपी मदिरा पिऊन धुंद हाेताे. विषयाच्या खाेलीमध्ये विकाररूपी स्त्रीसह ताे सुखावताे. अशा प्रकारच्या विकल्पाने बुद्धीचा भ्रम हाेताे. उलट जन्ममरणाची कथा पुन्हा ऐकू नये म्हणून माझ्या भक्ताचे प्रयत्न सुरू असतात. सर्व ब्रह्मच आहे असा अनुभव त्याला येताे.हे अनुभवरूपी फळ पिकले की त्यातून पूर्णतेचा रस गळू लागताे. द्वैताचे दारिद्र्य त्याच्या ठिकाणी उरत नाही.
असे अनुभवनिपुण पुरुष माझ्या भजनी अंत:करणपूर्वक असतात. यांनाच याेगी समजावयास हरकत नाही.अर्जुना, या भक्तांच्या बाेलण्यात नाना प्रकारच्या अर्थाने रसाळ झालेली व भक्तिप्रेमाच्या सुगंधाने दरवळलेली महावाक्यांची फळे प्रकट हाेतात.या भूमिकेवर पाहिले असता असे ध्यानात येते की, अर्जुनाच्या ठिकाणी असलेली भगवंताची स्वाभाविक कृपा म्हणजे मंद वायू हाेय. या मंदवायूने श्रीकृष्णरूपी वृक्षाची फळे अर्जुनाच्या श्रवणरूपी झाेळीत अकस्मात पडली. ही वाक्यरूपी फळे सिद्धांतमय हाेतीच; पण ती ब्राह्मरसाच्या समुद्रात बुचकळून काढली हाेती. परमानंदात ती घाेळविली हाेती. अशा या शुद्ध व रसाळ फळांकडे पाहून अर्जुनाच्या चित्तात ज्ञानाचे डाेहाळे उत्पन्न झाले.ताे अमृताचे घाेट घेऊ लागला.