आपण नेहमी म्हणताे की, तुम्ही जे पेराल तेच उगवते. तुम्हाला मधुर आंब्याची फळे हवी असतील तर कारल्याचे बी पेरून ती मिळणार नाहीत; त्यासाठी आंब्याचीच काेय लावली पाहिजे. तसेच परमेश्वरी कृपा हवी असेल तर त्यासाठी आपला भाव शुद्ध ठेवून त्याच्या भक्तीचे बीज अंत:करणात लावले पााहिजे. ज्यांना भगवंत आवडताे अशा भक्तांच्या हाकेलाच भगवंत पावताे आणि त्याच्या प्रसन्न हाेण्याने भक्तांची प्रपंचाची दु:खे नष्ट हाेतात.आपला ‘मी’पणा साेडून जे ईश्वराचे चरणी सर्वस्व अर्पून लीन हाेतात, त्यांनाच निजसुखाचा म्हणजे आत्मप्रचितीच्या चिरंतन आनंदाचा लाभ हाेताे. अशा भाविक भ्नतांचे संपूर्ण जीवन धन्य हाेऊन जाते. मनुष्यजन्मात आल्याचे सार्थक हाेते आणि अंती ते परमगतीला प्राप्त हाेतात.
अलाैकिक संतत्व अंगी असूनही श्रीसमर्थांच्या वाणीमध्ये आणि लेखणीमध्ये राेखठाेकपणा ठायी ठायी भरलेला आहे.म्हणूनच ते सांगतात की, ज्याचा जसा भाव असेल, त्याच प्रमाणात त्याला देवाची कृपा प्राप्त हाेईल. प्रत्येक प्राणिमात्राच्या अंतरातील भाव स्पष्टपणे जाणणाऱ्या भगवंताला म्हणूनच अंतर्साक्षी म्हणतात. भक्ती आणि कृपा यांचा संबंध आरशामध्ये दिसणाऱ्या बिंबाच्या प्रतिबिंबासारखा आहे, असे सांगून श्रीसमर्थ म्हणतात की, तुम्ही आठ्या घालून पाहिले तर तेही आठ्या घालते, तुम्ही ताेंड वेंगाडले तर तेही ताेंड वेंगाडते आणि आपण सुहास्य मुद्रा केली तर आरशातही सुहास्य मुद्राच दिसते. त्याचप्रमाणे ज्याचे जसे भजन असेल त्याच प्रमाणात त्याला भगवंताकडून समाधान मिळेल