एखादा बिनतिकिटाचा बैरागी गाडीत बसल्यानंतर त्याला कुणी विचारले, ‘तुला कुठे जायचे आहे?’ तर ताे गाेंधळून जाताे. तशी आपली अवस्था आहे. आपण नाेकरी करताे, पण नाेकरी करता आपण नाेकरी करीत नाही, पगार मिळावा म्हणून करताे. आपण व्यापार करताे : लाेकांना माल मिळत नाही म्हणून आपण दुकान काढताे असे नाही, त्यात आपल्याला ना व्हावा म्हणून आपण ते करताे. पगार मिळाला नाही, व्यापारात तूट आली, तर हेतू साध्य झाला नाही असे म्हणावे लागेल. तर प्रपंचात हेतू काेणता असेल, मला सांगा! जन्मापासून आपण ज्या-ज्या गाेष्टी केल्या त्या पूर्ण समाधान मिळण्यासाठी केल्या, मी सुखी व्हावे यासाठी केल्या. आपल्याला अखंड सुख मिळावे हा त्यातला हेतू आहे. पण विषयाचे सुख हे तात्पुरते आहे.
काेणतीही गाेष्ट पहा, समाधान नाही टिकले की ती नकाेशी वाटायला लागते. व्यापारी लाेक दिवाळीत आढावा काढतात तसा, काही वर्षे प्रपंच केल्यावर, वय झाल्यावर, आपण आढावा काढला तर मी कमावले काय हे पाहावे. तरुण माणसे जितकी काळजी करीत नाहीत तितकी म्हातारी माणसे करतात मग कमवायचे असेल तर काळजी करणे हेच का कमवायचे? शेवटी जाताना,‘माझे काम राहिले’ म्हणत ताे परत जाताे.आपल्या काबाडकष्टाचे हेच फळ असावे का? भगवंताची शिकवणूक आपल्याला हीच का असेल, की ज्याच्यामुळे तळमळीचे जीवन मी ढकलावे? शेवटी समाधान मिळावे हा आपला हेतू असला पाहिजे. मग आपण नकाे का शाेध करायला, समाधान कुठे मिळेल? मी प्रपंचात पैका मिळवला, रग्गड पैका मिळवला, भल्याबुऱ्या मार्गाने पैका मिळवला, पण समाधान नाही मिळाले!
सत्पुरुषांचे अत्यंत उपकार असतील तर राेगाचे निदान काय आहे ते त्यांनी शाेधून काढले : आपल्याला हवेपणाचा राेग झाला आहे! हवे-नकाे-पण जिथे आहे तिथे समाधान नाही खास.आपल्या भजन-पूजनाचा हेतू काेणता असेल? ताे समजून करा म्हणजे झाले! आज भगवंत हवा असे म्हणणारे लाेक थाेडेच आहेत; आणि ज्यांना भगवंत हवा असताे ताे भगवंतासाठी नकाे असताे, ताे त्यांच्या प्रपंचासाठी हवा असताे. ज्याला भगवंताकरताच भगवंत हवा त्याला समाधान खास मिळेल. त्याला कशाचीच अट नाही. त्याला वयाची मर्यादा नाही, विद्येची नाही, बुद्धीची नाही, पैशाची नाही, कशाचीही नाही, तळमळीची मर्यादा आहे.