पत्र एकतिसावे
एकनाथ व रामदास यांचे नाते तुला माहीत असेल.एकनाथ हे रामदासांचे मावसे म्हणजे एकनाथांची बायकाे व रामदासांची आई या बहिणी बहिणी.रामदास बारावे वर्षी लग्नमंडपातून पळून गेले. हा चमत्कार अलाैकिक आहे. हल्लीच्या काळी काेणता वर लग्नमंडपातून पळून जाईल? हल्लीच्या काळी चमत्कार झालाच, तर वर वधूसकट पळून जाईल, पण रामदास एकटेच पळून गेले व त्यांची आई दु:खीकष्टी झाली.एकनाथ देखील वयाच्या बारावे वर्षी आजाआजींना न सांगता गुरूच्या शाेधार्थ घर साेडून निघून गेले. मुसलमानी राज्यात दाैलताबाद किल्ल्यावर माेठ्या अधिकाराची जागा भूषविणारे जनार्दनस्वामी अधिकारी सत्पुरुष म्हणून ख्याती पावले हाेते. नाथ पैठणाहून निघाले ते पायी चालत दाैलताबादेस जनार्दनस्वामींच्या द्वारी येऊन पाेचले.त्या तेज:पुंज मुलाला पाहून जनार्दन स्वामींना खूप आनंद झाला.
जनार्दने उचलुनी मुलाला। आलिंगले पूर्ण सुखी जिवाला।। नाथांनी जनार्दनस्वामींची पराकाष्ठेची सेवा केली व त्यांच्यापासून परमार्थाचे धडे घेतले. स्वामींनी नाथाला दत्तात्रयाचे सगुण साकार रूप दाखवले.परमार्थ मार्गात नाथांची भरपूर प्रगती झाल्यावर नाथ व जनार्दनस्वामी तीर्थयात्रेस निघाले.तीर्थयात्रा करत असताना जनार्दन स्वामींनी चतु:श्लाेकी भागवतावर टीका करण्यास नाथांना सांगितले.नाथांनी नाशिक पंचवटीमध्ये चतु:श्लाेकाचे विवरण केले. हाच नाथांचा पहिला ग्रंथ.नाशिक पंचवटीहून नाथ व जनार्दनस्वामी त्र्यंबकेश्वरला आले व मग पुढे नाथांनी एकट्यानेच तीर्थयात्रा केली.वयाच्या चाेविसाव्या वर्षी नाथ परत पैठणास आले.
रामदास बारावे वर्षी लग्नमंडपातून पळून गेले व बारा वर्षे तपश्चर्या करून वयाचे चाेविसाव्या वर्षी तीर्थयात्रेस निघाले.बारा वर्षे तीर्थाटन करून रामदास कृष्णातीरी आले व त्यांनी आपल्या दिव्य संप्रदायाची उभारणी केली.
नाथ बारावे वर्षी घर साेडून निघून गेले व पुढल्या बारा वर्षांत गुरुसेवा व तीर्थाटन करून परत पैठणास आले.तू असे लक्षात घे कीजीवन म्हणजे नुसतेच शंकराचे तांडवनृत्य नसून भिल्लीणीचे रूप घेऊन आपल्या माेहक नि उन्मादक हालचालीने सगळ्या चराचराला माेहिनी घालणाऱ्या पार्वतीचे नाजूक नृत्यदेखील आहे.गुरूंच्या आज्ञेने नाथांनी गृहस्थाश्रम स्वीकारला व प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय करून दाखवला.प्रपंच व परमार्थ यांचा समन्वय करणारा आदर्श पुरुष म्हणजे गाेपालकृष्ण! आपला महाराष्ट्र प्रांत धनधान्याच्या बाबतीत कमी सुपीक असेल; पण साधुसंतांच्या बाबतीत ताे फार भाग्यवान आहे.ज्ञानाेबापासून ताे थेट विनाेबांपर्यंत आपल्या प्रांतात संतांची अखंड परंपरा सुरू आहे.आपल्या महाराष्ट्राचे साधुपंचायतन काेणते असे जर काेणी विचारले तर त्यांचे उत्तर असे कीज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास - हे आपले साधू पंचायतन आहे.