म्हणाेनि प्रणवैकनाम । हें एकाक्षर ब्रह्म । जाे माझें स्वरूप परम । स्मरतसांता।। 8.118

10 Dec 2022 13:53:21
 
 

Dyaneshwari 
 
याेगी ब्रह्मरूप हाेताे म्हणजे काय हाेताे हे स्पष्ट करताना भगवान म्हणतात, प्रणव म्हणजे ॐकार असून त्याचे स्वरूप एकाक्षरी ब्रह्मासारखेच आहे. याची प्राप्ती हाेण्यासाठी मनाची बाहेरची धाव सर्वथा नाहीशी करावी.हृदयाच्या डाेहातच बुडून राहावे. हे सर्व कसे घडणार? तर सर्व इंद्रियांच्या द्वाराला निग्रहाची अखंड कवाडे लावली तरच हे शक्य हाेईल. हातपाय माेडलेला मनुष्य आपल्या कुटुंबातील माणसांना साेडून जात नाही. त्याप्रमाणे आत काेंडलेले मन तसेच हृदयाच्या ठिकाणी स्थिर हाेते. अर्जुना, एकदा चित्त स्थिर झाले, की प्राणाचा प्रणव करावा. म्हणजे प्राणातील हंस असा जाे जपयज्ञ आहे ताे करावा आणि या जपाला आधारचक्राच्या क्रमाने ब्रह्मरंध्रापर्यंत आणावे.नंतर अ, ऊ, म् या प्रणवाच्या मात्रा अर्धबिंबात मिळेपर्यंत प्रणव धरून ठेवावा. प्राण आकाशात स्थिर करावा.
 
मग ऐक्यानंतर ताे परब्रह्माच्या स्वरूपी आहे असाच अनुभव येताे. असे झाले की, प्रणवचा उच्चार हाेत नाही व प्राणही लीन हाेताे. मग प्रणववाच्य प्रणवातीत असे जे ब्रह्म त्याचेच रूप याेग्याला प्राप्त हाेते. म्हणून प्रणव म्हणजे ॐ हे एक नाव म्हणजे एकाक्षर ब्रह्मच हाेय.
जाे काेणी माझे स्मरण करील त्याला याची प्राप्ती हाेते.इतके तत्त्वज्ञान सांगितल्यानंतर भगवंतांच्या मनातच एक शंका आली की, अर्जुनाला हेही समजणार नाही. ते त्याला म्हणाले, अर्जुना, कदाचित तुझ्या मनात असे येईल की, अंतकाळी माझे स्मरण हाेणे कसे शक्य आहे? इंद्रियांचे व्यापार बंद पडले, जिवंतपणा राहिला नाही, मरणाची लक्षणे दिसू लागली, तेव्हा काेणी स्मरण करावयाचे? इंद्रियांचा निराेध काेण करणार? आणि अंत:करणाने प्रणवाचें चिंतन कसे करावयाचे? पण या शंका अर्जुना, मनात आणू नकाेस. तू नीट लक्षात ठेव की, माझे नित्य सेवन करणारा जाे आहे ताे मरणसमयी माझाच सेवक हाेताे.
Powered By Sangraha 9.0