तुका म्हणे नव्हे सरी ।विष अमृताची परी ।।1।।

08 Nov 2022 15:09:23
 
 

saint 
 
मूळात समान असणारा माणूस स्वभावामुळे, सहवासामुळे किंवा मनाेवृत्तीमुळे असमान हाेताे. म्हणजेच माणूस एकमेकांपासून दूर हाेताे. मानवी वृत्ती कांहीना चांगुलपणाच्या मार्गावर नेते तर काहींना वाईट मार्गावर नेते. चांगल्या मार्गावरून चालणारी सर्वच माणसं कायमस्वरुपी चांगुलपणा टिकवून ठेवतीलच असेही नाही. त्याचबराेबर वाईट मार्गावरील मंडळी कायमस्वरूपी वाईटच राहतील असेही नाही. अर्थात चांगला माणूस वाईट आणि वाईट माणूस चांगला हाेऊ शकताे. अशा बदलालाही मानवी स्वभाव, सहवास, मनाेवृत्तीच कारणीभूत असते.
 
चांगल्यांना वाईट म्हटले तरी ते मूळात चांगलेच असतात, आणि वाईटांना चांगले म्हटले तरी ते वाईटच असतात. केवळ नांव बदलण्याने किंवा आपल्या म्हणण्याने कांही हाेत नाही. तर ते मूळात त्याप्रकारचे असावे लागते. विष ते विषच असते आणि अमृत ते अमृतच असते. विषाला अमृत म्हणून स्विकार केला तर मृत्यू अटळ आहे. त्याचप्रमाणे अमृताला विष म्हणून सेवन केले तर जीवन निश्चित आहे. अर्थात चांगले ते चांगलेच असते आणि वाईट ते वाईटच असते. या अनुषंगाने बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नव्हे सरी । विष अमृताच्या परी ।। जय जय राम कृष्ण हरी.
-डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0