आपण म्हणता, ‘मी बीजे तर अमृताची पेरली हाेती, मग त्याला ही कडू फळे कशी काय आलीत?’ लक्षात असू द्या फळ हीच कसाेटी आहे, हीच परीक्षा आहे-बीजाची. आपण काेणते बीज पेरले हाेते, ते फळच सांगून टाकते. आपण पेरताना कल्पना काय केली हाेती, याच्याशी बीजाचा काय संबंध? आपणा सगळ्यांना जीवनात आनंद पाहिजे असताे. पण मिळताे कुठे ताे आनंद? आपणा सगळ्यांनाच जीवनात शांती पाहिजे असते, पण कुठे येते ती शांती? आपणा सगळ्यांनाच पाहिजे असताे सुख, समृद्धी यांचा वर्षाव. पण हा वर्षाव कधी हाेतच नाही.
म्हणून या बाबत या सूत्रातून एक गाेष्ट समजून घ्यायला पाहिजे की, फळे आपल्या इच्छेतून येत नसतात, तर आपण जे पेरू त्यातून येत असतात. आपणाला पहिजे असते एक आणि आपण पेरताे भलतेच काहीतरी. आपण पेरताे विषाची बीजे आणि आपणास पाहिजे असतात अमृताची फळे! मग जेव्हा फळे येतात ती विषाचीच असतात, दु:ख, पीडा यांचीच असतात. नरकाचेच फलित आपल्या हाती पडते.आपण सारे आपल्या जीवनाचे अवलाेकन करू तर आपल्या हे लगेच लक्षात येईल.आयुष्यभर चालून-चालून आपण दु:खांच्या खाचखळग्यांशिवाय दुसरीकडे काेठेही पाेहाेचताेय असे दिसत नाही. राेजच्या राेज दु:ख मात्र आणखी वाढत जाते. राेज रात्र संपत नाही, राेजच्या रेाज ती आणखीच माेठी हाेत जाते.