मरता मरता वाचलेला ताे माणूस पुन्हा कसा निगुतीने प्रपंचाला लागताे ते सांगताना श्रीसमर्थ सुरेख शब्दयाेजना करतात. ते म्हणतात ‘‘बरवी घरवात मांडिली’’. आपल्या संस्कृतीत नांदत्या घराचे सुलक्षण म्हणजे राेज संध्याकाळी देवापुढे दिवा लावणे हे मानले जाते. असा दीप बाह्य अंधाराचा आणि अंतरातल्या दुर्वासनांचा नाश करताे आणि घर आणि मन दाेन्ही तेजाने भरून प्रसन्न करताे असे मानले जाते. म्हणूनच त्याने घरात उत्तम तेलवात करायला सुरुवात केली.गेलेले वैभवही पुन्हा प्रयत्नाने मिळविले; पण तरीही त्याचा पैशाचा लाेभ सुटला नाही. वैभव हाती आले पण पाेटी संतान नाही म्हणून ती दाेघे पती-पत्नी फार दु:खी झाली. वंशवृद्धीला पुत्र हवा पण ताे नशिबात नसेल तर सुखदायी कन्या तरी व्हावी म्हणून देवाची करूणा भाकू लागला.
त्याच्या कृपेने त्यांना मूल झाले आणि त्याचे काेडकाैतुक करण्यात ते मग्न झाले. त्या बाळाला काेठे ठेवू आणि काेठे नकाे असे त्यांना हाेऊन गेले. पण दुर्दैवाचा फेरा पुन्हा आला आणि ते बाळ अकस्मात मरण पावले.मानवी मनाच्या कथा व व्यथा ज्या जीवनाच्या वेलीवर नांदतात त्या जीवनाचीच कथा श्रीसमर्थ माेठ्या वळणावळणांनी मांडत आहेत. त्यामध्ये आधुनिक समीक्षकांना अभिप्रेत असलेले धक्के, गाठ, निरगाठ सगळे आहे आणि अर्थातच त्या कथेमागे माणसाने षड्रिपूंच्या गाठीतून मु्नत व्हावे हीच श्रीसमर्थांची तळमळ आहे.