पत्र सत्ताविसावे
प्रिय जानकी, मी आपल्या गच्चीवर बसलाे हाेताे. मंद मंद वारे वाहात हाेते. अंगावर पिस फिरवल्यामुळे गाेड शहारे निर्माण व्हावे तसं वाटत हाेतं. संध्यासमय झाला हाेता. आसपास डाेंगर दिसत हाेते.त्या डाेंगराच्या काळसर जांभळट रंगावर संध्यादेवीचा लालसर नारिंगी रंग शाेभून दिसत हाेता. मी चारी दिशांना पाहात हाेताे. लता वेलीशी, झाडाझुडूपाशी हितगुज करणारी, त्यांच्या पानाफुलांत राेम राेमात मंद हास्याची लहर पसरवणारी नयनमनाेहर वाऱ्याची झुळूक पाहून मी एका अनुपम रम्य वातावरणात गेलाे हाेताे.आणि त्यावेळी संध्याकाळच्या डाकेने तुझे पत्र आले.शृंगाराला वाटते की आपण रम्य वातावरणात विहार करत असताना जवळ पत्नी पाहिजे व तिने प्रेमाची भाषा बाेलली पाहिजे.
परमार्थाला वाटते की आपण रम्य वातावरणात विहार करत असताना पत्नीने शृंगारिक भाषा न बाेलता तत्त्वज्ञानाची भाषा बाेलली पाहिजे. तुझ्या पत्राला तत्त्वज्ञानाचा मंद मधुर सुगंध येत हाेता आणि त्यामुळे साहजिकच मी माेहून गेलाे.आपल्या पत्रात तू चातुर्वर्ण्याबद्दल विचार मांडले आहेत.गीतेच्या चाैथ्या अध्यायात भगवान कृष्ण म्हणतात.चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्मंविभागश:। चार वर्णाची व्यवस्था गुण व कर्म यांच्या भेदांप्रमाणे मी निर्माण केली आहे.तू असे लक्षांत घे की चातुर्वर्ण्य जन्मावर अवलंबून नसून गुणकर्मावर अवलंबून आहे. महाभारतात वनपर्वात नहुष-युधिष्ठिर संवादात, व द्विजव्याध संवादात, शांतिपर्वात भृगुभारद्वाज संवादात, अनुशासन पर्वात, उमामहेश्वर संवादात आणि अश्वमेध पर्वात अनु गीतेत चातुर्वर्ण्य व गुणभेद ह्या बाबतीत विचार मांडले आहेत.
शंकराचार्य म्हणतात.सत्त्वप्रधानस्य ब्राह्मणस्य, सत्त्वाेपसर्जनरज:प्रधानस्य क्षत्रियस्य, तमउपसर्जनरज:प्रधानस्य वैश्यस्य, रजउपसर्जनम:प्रधानस्य शुद्रस्य- यावरून तुला समजून येईल कीसत्त्वगुण प्रधान -ब्राह्मण, सत्त्वगुण गाैण रजाेगुण प्रधान - क्षत्रिय, तमाेगुण गाैण रजाेगुण प्रधान- वैश्य रजाेगुण गाैण तमाेगुण प्रधान शुद्र.रामानुजाचार्य म्हणतात - चातुर्वण्यप्रमुखं कृत्स्नं जगत् सत्त्वादि गुणविभागेन निर्माण केले.मध्वाचार्य म्हणतातसात्त्विक: ब्राह्मण:, सात्त्विकराजस:क्षत्रिय:, राजस तामस: वैश्य: तामस: शूद्र: इति गुणविभाग:। सात्त्विक - ब्राह्मण सात्त्विक राजस -क्षत्रिय राजस तामस -वैश्य तामस - शूद्र