मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जागतिक बँकेस आवाहन : विविध प्रकल्पांबाबत केली चर्चा

26 Nov 2022 13:13:35
 

flood
मराठवाडा, विदर्भातील शेतकरी आत्महत्या राेखण्यासाठी कृषी प्रकल्पांसाेबतच दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने तयार केला असून, त्यासाठी जागतिक बँकेने अर्थसाह्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.जागतिक बँकेचे भारतातील प्रमुख ऑगस्टे तानाे काैमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शिष्टमंडळात शबनम सिन्हा, आदर्श कुमार, सुदीप माेजुमदार, झियांग वाँग या सदस्यांसमवेत निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, काैशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक लाेकेश चंद्रा, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग आदी या वेळी उपस्थित हाेते.
 
महाराष्ट्र काैशल्य विकास प्रकल्प, हवामान बदल आणि त्यामुळे कृष क्षेत्रावर हाेणारा परिणाम, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प, बेस्टसाठी इलेक्ट्रिक बस याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या विविध याेजनांपैकी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मराठवाडा व विदर्भातील सुमारे 5000 गावांना फायदा हाेत आहे.या प्रकल्पाला जागतिक बँकेचे सहाय्य लाभले असून, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्विततेनंतर दुसऱ्या टप्प्यास मान्यता देण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. या वेळी अपर मुख्य सचिव कपूर, प्रधान सचिव वर्मा, गुप्ता, डवले यांनी आपापल्या विभागाच्या प्रकल्पांविषयी माहिती दिली.
Powered By Sangraha 9.0