भक्ती म्हणजे संलग्न हाेणे.विषयाकरिता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती झाली, परमेश्वराची कशी हाेईल? मीपणा आला की संकल्प उठतात, आणि संकल्पात्मक विषय तेच मनात येतात. मीपणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी तीत कमीपणा आहे पंचाचा त्याग करून, बैरागी हाेऊन मठ बांधला, पण मठाच्या बंधनात पडला! देवाला दागिने घातले, का तर ते त्याचे रूप आपल्याला चांगले दिसावे म्हणून! चांगल्या कृत्यांतसुद्धा मीपणा कसा लपून बसलेला असताे बघा! थाेडक्यात म्हणजे, मीपणाचे विसर्जन केले पाहिजे.ज्याच्याकडे कर्तेपण आहे त्याला ते देऊन आपण सुखदु:खातीत राहावे. ‘हे सर्व ईश्वराचे आहे’ हेच सार वेदश्रुती सांगतात; ‘हे सर्व रामाचे असून ताेच सर्वांचा कर्ता आहे’ असे संत सांगतात. दाेघांचेही सांगणे एकच.
अशी भावना ठेवल्यावर सुखदु:ख भाेगावे लागणार नाही. मी कर्ता नसून राम कर्ता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना. मी काही नाही, काेणीतरी बाहुली आहे, असे समजावे. एक भगवंत तेवढा माझा असे म्हणावे. संताजवळ राहिल्याने आसक्ती जरी पुरती सुटली नाही तरी नकळत कमी हाेत असते. म्हणून आपण नेहमी संतसमागमात राहावे. संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर ार परिणाम हाेताे. आपण हातात काठी घेतली तर उगीच कुणाला मारावेसे वाटेल; ही झाली काठीची संगत. आपण हातात माळ घेतली तर तिने जपच करू, माळेने आपण काही कुणाला मारणार नाही.आपल्या पाेशाखात, वागण्यात, बाेलण्यात, सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते, म्हणून संताचा सहवास नेहमी ठेवावा.
गाय जशी वासरामागून येते तसे संत नामामागून आलेच पाहिजेत. ते नाम घेणाऱ्याला धुंडाळीत येतील आणि त्यांच्या मागाेमाग भगवंत अर्थात आलाच म्हणून समजा. संतांच्या संगतीत आपण गेलाे की आपले कर्तृत्व संपले. दवाखान्यात गेलेला राेगी जसा डाॅक्टरच्या स्वाधीन असताे, तसे आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन हाेताे. म्हणून, संतांच्या संगतीत आपण गेलाे की आपले कर्तृत्व संपले असे मानले पाहिजे.सत्संगतीने साधकाची वाढ हाेते. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही. संतांना भक्तीचे व्यसन असते; ते नेहमी नामात असतात. भगवंताची वृत्ती किंवा प्रेम अव्यक्त असते; पण नाम मात्र व्यक्त आहे. म्हणून नामातच संतांचा समागम आहे. संत हे भगवंतावाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत, म्हणूनच ते संत झाले, म्हणजे देवस्वरूप बनले.