कां जें यया मनाचें एक निकें। जें देखिले गाेडीचिया ठाया साेके। म्हणाेनि अनुभवसुखचि कवतिकें। दावीत जाइजे।। 6.420 साेप्यांतला साेपा मार्ग म्हणजे मनाची साम्यावस्था धारण करण्यासाठी भगवंत अर्जुनाला सांगतात. तरी अर्जुनाच्या मनातील शंका दूर हाेत नाही. ताे प्रेमळपणाने भगवंतांना म्हणाला,‘देवा, तुम्ही हे सर्व माेठ्या कळकळीने सांगत आहात. पण एक अडचण सांगताे. ज्या मनाला साम्यावस्था प्राप्त करून घ्यावयाची ते स्वभावत:च अतिशय चंचल आहे. त्याला आम्ही कसे आवरणार? त्याच्या वागण्याचा काही पत्ता लागत नाही.मग या मनाला कसे आवरावे? माकड कधी शांत राहील का? वादळी वारा स्वस्थ्य रहा असे म्हटल्याने कधी शांत हाेईल का? देवा, हे मन बुद्धीचा छळ करते.
निश्चयाला डळमळून टाकते. धैर्याला फसवून निघून जाते. विवेकाला भूल देते. हे दाबले असता वर जाेराने उसळते. हे मन आपला चंचलपणा कधीच साेडत नाही.अशा या अस्थिर मनाला साम्यावस्था कशी प्राप्त हाेईल?’ यावर भगवंत म्हणाले, ‘अर्जुना, तुझे म्हणणे अगदी खरे आहे. चंचलता हा या मनाचा स्वभावच आहे. ते कधीही स्थिर राहणार नाही. पण वैराग्याचा आधार घेऊन त्याला याेगाभ्यासाच्या मार्गाला लावावे. तरच ते स्थिर हाेण्याची शक्यता आहे.कारण या मनाची एक खाेड तुला सांगताे की, त्याला ज्याची एकदा गाेडी लागली, चटक लागली की ते त्याची पाठ साेडत नाही. त्याप्रमाणे मनाला नीट सांभाळून आत्म सुखाची गाेडी लावावी. पण जे अभ्यास करीत नाहीत. जे विरक्त नाहीत, त्यांना हे मन आवरता येणार नाही. आपण जर विषयांतच बुडून राहू तर मग हे मन कधी निश्चल हाेईल का? म्हणून तू आधी या मनाला मार्गी लाव.’