देहाचे, इंद्रियाचे लाड करण्याच्या नादात माणूस मानवता विसरत आहे.मानवाची ही अमानवता केवळ समाजाला अनुभवायला मिळत आहे,असे नव्हे तर त्याच्या कुटुंबालाही अनुभवायला मिळते आहे.आपल्या आई- वडिलांशी, बंधू-भगिनीशी नीट न बाेलणे, लहान-सहान घटनेवरून वाद विवाद करणे इत्यादी अमानवतेचेच लक्षण आहे.ही अमानवता आपणाला माणुसकीपासून दूर नेते.
जेथे माणुसकी नाही, तेथे समत्व राहण्याचा प्रश्नच नाही.अनेक जीवांशी ऐक्य पावण्याकरिता समत्व असावेच लागते. आपण काेण आहाेत?आपण काय करायला हवे?आपण काय व का करीत आहाेत?
या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वपरिचयाकडे वळणे हाेय.एकदा का खरा स्वपरिचय झाला की मग जन वेगळे वाटण्याचा प्रश्न राहत नाही. सर्व जीव आपल्याप्रमाणे एका ईश्वराचे अंश आहेत. सर्व जीवांना सारखा अधिकार आहे. असे बरेच कांही सकारात्मक वाटू लागते. ही सकारात्मकता रिक्त हाताने आलाे तसे रिक्त हातानेच जावे लागते याची आठवण देते.ही आठवण नकाे ती जमवाजमव करण्यापासून म्हणजे अमानवतेपासून आपणाला परावृत्त करणे. अर्थात सर्व जीवांशी ऐक्य साधण्याचा मार्ग माेकळा हाेताे. जय जय राम कृष्ण हरी - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर, जालना माे. 9422216448