आपल्या याेग्यतेविषयी आलेली शंका अर्जुनाने भगवंतांना विचारली आणि त्यांनी तिचे निराकरणही केले.याेग्यता काेणास प्राप्त हाेत नाही याचेही विवेचन ज्ञानेश्वर येथे करतात.जाे आपल्या जिव्हेचे लाड करताे, जाे सर्वस्वी झाेपेच्या अधीन असताे, ताे या याेगाच्या साधनेस याेग्य नसताे. जाे दुराग्रही बनून तहानभुकेला काेंडून आपला आहार साेडताे, ताेही या याेगाला याेग्य नाही.आग्रहाने झाेपेचे नावही न घेणे आणि हट्टाने शरीराला पीडा देणे हा कसला याेग? या याेगात आपले शरीरच आपल्या ताब्यात नसते. म्हणून अर्जुना, विषयांचे अतिरिक्त सेवन जसे नकाे तसाच त्यांचा त्यागही नकाे. आहार सेवन करावा हे खरे; पण ताे उचित आणि बेताचा असावा. सर्वच कामे उचित आणि याेग्य असावीत. बाेलणे माेजके असावे.
चालणे माेजके असावे. झाेपेलाही याेग्य वेळी मान द्यावा. जागरण करणे अगत्याचे असले, तरी त्यालाही मर्यादा असावी. असे झाले तरच शरीरातील कफपित्तादि रसांचे याेग्य प्रमाण राहून सुख हाेईल. इंद्रियांना नियमितपणाने विषयांचा आहार दिला तर मन संताेष पावते.आपल्या बाहेरच्या आचरणात असा नेमस्तपणा ठेवला तर अंतरंगात सुखाची वाढ हाेते. आणि प्रत्यक्ष याेगाचा अभ्यास न करताच याेग केल्याचे फल प्राप्त हाेते. सतत उद्याेग केल्याने सर्व तऱ्हांचे वैभव घरी चालून येते. त्याप्रमाणे नेमस्त वर्तन ठेवल्यास मनुष्य सहजासहजी अभ्यासाच्या मार्गास सरावताे, आणि त्याला आत्मसिद्धी मिळते.म्हणून अर्जुना, ज्या सुदैवी पुरुषाला हा कर्मयाेग साधला ताे माेक्षसिंहासनावर शाेभून दिसताे.