मानव हा निसर्गत: समाजशील प्राणी आहे.त्यामुळे त्याला काेणाच्या ना काेणाच्यातरी सहवासात राहावे वाटत असते. चांगल्यांचा सहवास लाभावा म्हणून अनेकांची धडपड चालू असते. मुळात चांगला काेण याचा शाेध लागणे अवघड आहे. केवळ राहणीमान, खाणे पिणे उच्च काेटीचे आहे व त्याच्याकडे सत्ता, पैसा आहे म्हणून ताे चांगला आहे, असे हाेत नाही.या सर्व दिखाऊ वस्तू मुळात नाशवंत असल्याने अशांना माेठे, चांगले म्हणण्यात अर्थ नाही. अशांचा सहवास सामान्यामध्ये चांगले परिवर्तन करेलच असे नाही. मात्र बाह्यदेखाव्यापेक्षा अंतर्गत वर्तन, विचार, भाव, वृत्ती चांगली असेल, तर असा व्यक्ती खऱ्या अर्थाने चांगली असते आणि अशा चांगल्या व्य्नतीचा सहवास दुर्जनामध्येही चांगुलपणाच्या निर्मितीला व चांगुलपणाच्या वाढीला खतपाणी घालू शकताे.
कठीण काळात चांगल्याचे रक्षण त्याच्या चांगुलपणामुळे आपाेआप हाेते. एवढेच नव्हे तर त्याच्या सहवासात राहणाऱ्या सामान्यांचेही सहज रक्षण हाेत असते. माेहाेराच्या संगतीत असणारे सुत अग्नीचा संग लागला तरी जळत नाही. त्याप्रमाणे सज्जनाच्या संगतीने दुर्जनही संरक्षण पावू शकताे.या अनुषंगाने बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, माेहाेराच्या संगे । सुत नव्हे अग्नीजाेगें ।। जय जय राम कृष्ण हरी -डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर, जालना माे. 9422216448