बाळांनाे ! ज्याच्यावर कुणाची सत्ता चालत नाही, जाे कधी कुणापासून लाच घेत नाही, जाे गेलेला कधी परत येत नाही, जाे जात असताना कुणाला कळत नाही, जाे किती गेला आणि किती उरला हे कुणाला सांगता येत नाही, आणि जाे भगवंताशिवाय कुणाला भीत नाही, असा काळ आजपर्यंत कुणालाही चुकला नाही.ज्या काळाच्या सत्तेने वस्तू आकार धरते, त्याच काळाच्या सत्तेने ती अकस्मात माेडली जाते. सर्व दृश्य वस्तूंना हा नियम लागू आहे. मग आपला देह त्यातून कसा सुटेल ? पण ज्याने भगवंत घट्ट धरून ठेवला, त्याचा देह राहिला किंवा गेला, तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक नाही पडला. भगवंत आकाराने नाहीसा झाला, परंतु नामरूपाने जगात शिल्लक उरला. म्हणून, यापुढे कुणी सांगणारा भेटाे वा न भेटाे, तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये. जाे भगवंताचे नाम घेईल त्याचे राम कल्याण करील, हे माझे सांगणे खरे माना.
प्रपंच लक्ष देऊन करा, परंतु त्यामध्ये भगवंताला विसरू नका, हाच माझा अट्टाहास आहे. त्याच्या स्मरणात सर्वांनी आनंदात दिवस घालवा. नाम हे रामबाणाप्रमाणेच आहे. रामबाण म्हणजे बराेबर काम करणारा बाण; आपल्या लक्ष्यावर अचूक जाणारा ताे बाण पुन: परत येऊन भात्यामध्ये बसत असे. रामनाम हे रामाच्या जवळ राहणारे आणि अचूक रामाकडे नेणारे एकमेव साधन आहे. खराेखर नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीने ार साेपा आहे. त्याला काेणतीही उपाधी लागत नाही, त्याला काळवेळ नाही, त्याला स्थलाचे आणि देहाच्या अवस्थेचे बंधन नाही. जाेपर्यंत जीवाला शुद्ध आहे, ताेपर्यंत नाम घेता येते. पण दुसऱ्या दृष्टीने नामस्मरणाचा अभ्यास कठीण आहे. नामाला स्वत:ची अशी चव नाही, म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येताे.
उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही. उपाधीमध्ये मन रमते. यासाठी नामात रंगणे ही माेठी भाग्याची गाेष्ट आहे. ज्याचे मन नामात रंगू लागले त्याला स्वत:चा विसर पडू लागला असे समजावे. ज्याचे चित्त पूर्णपणे नामात रंगले ताे स्वत:ला पूर्णपणे विसरताे, आणि त्याला भगवंताचे दर्शन घडते. नामाची चटक लागली पाहिजे. ती चटक एकदा लागली म्हणजे जगामधली सर्व ऐश्वर्ये तुच्छ वाटतील.हा बाजार मी मांडून बसलाे आहे ताे त्यासाठीच आहे.प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा चालू आहे. कुणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा. राम त्याच्या पाठीमागे उभा आहे. याची खात्री बाळगा, आणि सर्वांनी मनापासून नाम घ्या, हाच माझा सर्वांना आशीर्वाद.