त्रिपुरारी पाैर्णिमेनिमित्त 521 मिष्टान्नांचा श्रींना महानैवेद्य ’ विविध प्रकारच्या फळांची केलेली आरास आणि मिठाई, फराळाच्या तिखट-गाेड पदार्थांपासून वेगवेगळ्या पदार्थांचा दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकाेट मांडण्यात आला. त्रिपुरारी पाैर्णिमेनिमित्त लावलेल्या 1 लाख दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला हाेता. पुणेकरांनी हे दृश्य डाेळ्यांत साठवण्यासाेबतच माेबाइलमध्ये कैद करण्यासाठी माेठी गर्दी केली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने त्रिपुरारी पाैर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात 1 लाख दिव्यांचा दीपाेत्सव आणि 521 मिष्टान्नांचा अन्नकाेट आयाेजिण्यात आला हाेता.
या वेळी अप्पर पाेलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित हाेते. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभाऱ्यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला हाेता. याशिवाय ताेरण आणि फुले, रांगाेळ्यांनी मंदिराचा परिसर सजवण्यात आला.ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, की त्रिपुरारी पाैर्णिमेनिमित्त आयाेजित अन्नकाेटासाठी पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टने केले हाेते. त्यानुसार 521हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गाेळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकाेटात मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद ससून रुग्णालयात आणि मंदिरातील भक्तांना देण्यात आल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.