जवळपास प्रत्येक जीवाला आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ, माेठे आहाेत हे दाखवावे वाटते. म्हणूनच की काय, सासू-सासऱ्यांना सुनेवर अधिकार गाजवावा वाटताे, पुढच्या वर्गातील मुलांना मागच्या वर्गातील मुलांवर रुबाब दाखवावा वाटताे, श्रीमंतांना गरिबावर, माेठ्यांना लहानांवर, पतीला पत्नीवर, मालकांना नाेकरावर, वरिष्ठांना कनिष्ठावर अधिकार गाजवावा वाटताे.प्रत्यक्षात कांही प्रमाणात का हाेईना असा अधिकार गाजवलाही जाताे. इतरांवर अधिकार गाजवणे म्हणजे एक प्रकारे त्याच्यावर राज्य करणे हाेय. स्वत:वर राज्य करण्यात हारणारा माणूस इतरांवर राज्य करण्याचा प्रयत्न करताे. खरे म्हणजे इथेच माणूस चुकताे. ज्याला स्वत:वर राज्य करता येते ताे खऱ्या अर्थाने राजा हाेय.
अवास्तव अपेक्षा, धावणारे मन, नकारात्मक वृत्ती, संकुचित विचार, अहंकार, देहाभिमान, इर्षा-द्वेषात्मक वृत्ती आदींवर नियंत्रण करण्यात यशस्वी हाेणारा खराेखरच राजा असताे.त्याचे हे राज्य खऱ्या अर्थाने सार्वभाैम राज्य असते. या मनाच्या राज्यात आनंद मानणाऱ्या व्य्नतीला म्हणजेच भक्ताला संसारातील सार्वभाैम राज्याचे काहीच वाटत नाही. त्याला या सार्वभाैम पदाशी काही देणे-घेणे नसते. हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, सार्वभाैम राज्य । त्यांसि कांही नाहीं काज ।। -डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर, जालना माे. 9422216448