ज्ञानेश्वरीचा एक विशेष असा आहे की, ती भगवद्गीतेवर मराठीमध्ये टीका आहे. टीका म्हणजे भावार्थ स्पष्ट करणारे भाष्य. ज्ञानेश्वरांच्यापूर्वी सर्व पारमार्थिक वा आध्यात्मिक ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये हाेते. संस्कृत भाषा ही देवांची मानली जाई. वेद संस्कृतमध्ये, उपनिषदे संस्कृतमध्ये आणि गीता भागवतादि ग्रंथही संस्कृतमध्येच हाेते.यामुळे बहुजन समाज या ज्ञानाला पारखा हाेत चालला हाेता. पारमार्थिक ज्ञान समाजाच्या सर्व स्तरांवर पाेहाेचविणे आवश्यक झाल्यास ते समाजाच्या म्हणजे लाेकांच्या भाषेत मांडणे अगत्याचे हाेते. पण हे भान प्राचीन काळी ार थाेड्यांना हाेते. अडीच हजार वर्षांपूर्वी गाैतम बुद्धांनी आध्यात्मिक ज्ञान लाेकभाषेत सांगायला सुरुवात केली. ‘बहुजन सुखाय, बहुजन हिताय, चरख भिख्खाे’ अशी त्यांची शिकवण असल्याकारणाने धर्माच्या सर्व आज्ञा त्या काळातील प्राकृत भाषेमध्ये म्हणजे पालीमध्ये आहेत.
अशाेकादि राजांनी जेव्हा हा धर्म स्वीकारला तेव्हा त्यांनीही धर्माज्ञा पाली भाषेत प्रसृत केल्या. त्यानंतर दीर्घकाळानंतर प्राकृत भाषेमध्ये पारमार्थिक ज्ञान सांगण्याचा मान ज्ञानेश्वरांच्याकडे जाताे.ज्ञानेश्वरांच्या आधी सुमारे एक शतक महानुभाव पंथाचे श्रीचक्रधरस्वामी हे मराठीमध्ये बाेलत असत.हे त्यांच्या ‘लीळाचरित्र’ या ग्रंथावरून ध्यानात येते.एरवी मराठी भाषेकडे दुर्लक्षच हाेत असे. लाेकांचा कळवळा मनात आल्याने ज्ञानेश्वरांनी गीतेवर भाष्य लिहिण्यासाठी प्राकृत भाषेचा अवलंब करून तिचा गाैरव केला. मी काैतुकाने मराठी भाषेतच लिहीन.माझे शब्द असे असतील की, ते अमृताशीही पैज जिंकतील, अशी रसाळ अक्षरे मी निर्माण करीन. आणि गुरुकृपेवर त्यांनी ही प्रतिज्ञा पूर्ण करून संस्कृतनिष्ठांचा राेष ओढवून घेतला.