उपाधी करूनही विरक्ते। उदासीनता धरावी ।।2।।

04 Oct 2022 14:08:28
 
 

saint 
 
विरक्तानेही उत्तम वक्ता असलेच पाहिजे आणि त्याने आपल्या अमाेघ वाणीने लाेकांना वळवून घेऊन परमार्थाची पुनर्स्थापना करावी असे त्यांचे सांगणे आहे. त्याने अशा लाेकांच्या शंकांचे ज्ञानपूर्वक निरसन करून त्यांनाही विरक्तीच्या मार्गासाठी उद्युक्त करावे.
त्यासाठी हरिकीर्तन, भजन, निरूपण, कीर्तन यांचा गदाराेळ उडवून द्यावा व भगवंताचे उत्सव थाटाने करून अंधश्रद्धांच्या मनातही श्रद्धा उत्पन्न करावी. मात्र देवाचा उत्सव वैभवाने केला तरी त्यात कधीही स्वत: गुंतून जाऊ नये आणि आपला निरिच्छपणा साेडू नये. श्रीसमर्थ स्वत:च एका ठिकाणी सांगतात.‘‘दास डाेंगरी राहताे। उत्सव देवाचा पाहताे’’ म्हणजेच त्या वैभवापासून स्वत: विरक्ताने मात्र अलिप्त असावे. देव, धर्म आणि राष्ट्र या तिन्ही गाेष्टी वंदनीय आहेत आणि सर्वच लाेक त्यामध्ये सामील असावेत असा त्यांचा आग्रह आहे.
 
एखाद्याच माणसाने स्वत: एकांतात राहून उद्धरून जाणे त्यांना पुरेसे वाटत नाही, तर त्याने जनसामान्यात सदैव मिसळून त्यांचाही सन्मार्ग दाखवून उद्धार केलाच पाहिजे, अशी त्यांची शिकवण आहे. म्हणून विरक्ताने लाेकसंग्रह करावा. त्यासाठी लाेककार्ये करावी, परंतु त्यातही अलिप्तपणा राखावा. झालेल्या लाेककल्याणकारी कार्याबद्दल कधीही मानसन्मानाची अपेक्षा करू नये आणि मनातही चुकूनसुद्धा मी अमुक केले, तमुक माझ्यामुळे झाले असा अहंकार निर्माण हाेऊ देऊ नये. थाेड्नयात विरक्ताने मनातून पूर्णपणे विरक्त राहून लाेकसंग्रह, लाेकाेपयाेगी कार्य, धर्मप्रसार, सद्विचारांचा प्रसार, भगवंताची आराधना हे सर्व कार्य माेठ्या वैभवाने व पूर्ण क्षमतेने करीत राहावे! -प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299
 
Powered By Sangraha 9.0