आई-वडिलांची सेवा हीच ईश्वराची सेवा हाेय, असे संतांनी सांगितले आहे.आपण आई-वडिलांच्या ठिकाणी पांडुरंगाला पाहून महाराजांची आजची अभंगवाणी अनुभवण्याचा प्रयत्न करू या. आपले आई-वडील आपल्या सुखासाठी वाट्टेल ते कष्ट करतात. प्रसंगनुरूप आपण जागतात आणि आम्हाला शांत झाेपवतात.स्वत: काबाडकष्ट करतात आणि आम्हाला सुख देतात.कितीही दु:खं वाट्याला आली तरी त्या दु:खाची, अडचणीची झळ मुलांच्या वाट्याला येऊ देत नाहीत.मुलांच्या सुखासाठी स्वत:चा जीव देणारे ज्ञानदेवांच्या आई-वडिलांसारखे आई-वडिल समाजात कमी नाहीत.
मुलांच्या सुखासाठी आई-वडिलांनी जीवच द्यावा लागताे असे नाही.दिवसातून अनेकवेळा मृत्यूपेक्षाही भयानक यातना भाेगणारे आई-वडिल आहेत.तारुण्याच्या मस्तीत आई-वडिलांची आठवण हाेत नसली तरी आईवडिलांना मात्र मुलासाठी करावयाच्या कष्टाचा विसर पडत नाही.आपल्यासाठी आई-वडिल किती दु:ख सहन करतात आणि आपणाला किती सुख देतात याचे उत्तर निश्चितपणे काेणालाही सांगता येत नाही. कारण ते शब्दात व्यक्त करण्यापलीकडचे असते. असाे, आपल्या सुखासाठी दु:ख भाेगणाऱ्या आई-वडीलांचा आपणाला विसर पडता कामा नये.जय जय राम कृष्ण हरी.
-डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर, जालना माे. 9422216448