घारापुरी बेटावरील पाणीयाेजनेला राज्य सरकारची मंजुरी

    19-Oct-2022
Total Views |
 
 
ग्रामस्थ आणि पर्यटकांची 40 वर्षांपासून असलेली पाणीचिंता मिटणार; 17 काेटींची याेजना
 

Gharapuri 
 
जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ असलेल्या घारापुरी बेटावरील तीन गावांतील ग्रामस्थ व राेज येणाऱ्या हजाराे पर्यटकांची पिण्याच्या पाण्याची नव्या याेजनेमुळे व्यवस्था हाेणार आहे. यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 17 काेटी 59 लाख खर्चाच्या घारापुरी नळ पाणीपुरवठा याेजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.या महत्त्वाकांक्षी याेजनेमुळे बेटावरील तीन गावांचा आणि पर्यटकांचा पुढील 40 वर्षांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
 
बेटावरील राजबंदर, शेतबंदर व माेराबंदर ही तीन गावे आणि येथे येणाऱ्या पर्यटकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न साेडवण्यासाठी अनेक वर्षांपासून गावाेगावी असलेल्या वहिरी व धरणाचा उपयाेग केला जात आहे. मात्र, उन्हाळ्यात विहिरी, धरणातील पिण्याच्या पाण्याचे स्राेत आटत असल्याने कित्येक वर्षे पाण्याच्या समस्येला सामाेरे जावे लागते आहे.बेटावरील पाणी समस्या कायमची दूर करण्यासाठी तिन्ही गावे आणि पर्यटकांसाठी घारापुरी नळ पाणी याेजनेचा प्रस्ताव रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर केला हाेता. 2021 मध्ये सादर केलेल्या प्रस्ताव खर्चाच्या दृष्टिकाेनातून जिल्हा परिषदेच्या आवाक्याबाहेर हाेता.
 
पाच काेटींपेक्षा अधिक असलेल्या खर्चामुळे 29 जूनला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. किरण पाटील यांनी मंजुरीनंतर घारापुरी नळ पाणी याेजनेचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जीवन प्राधिकरणाकडे पाठवला हाेता. जीवन प्राधिकरणाने 17 काेटी 59 लाख खर्चाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मंत्रालयाकडे पाठवला हाेता, अशी माहिती प्राधिकरणाचे उप अभियंता नामदेवराव जगताप यांनी दिली.बेटावरील माेराबंदर येथील माेठा तलावातील पाण्याचा यासाठी वापर केला जाणार आहे. यासाठी तलावाची खाेली वाढवण्यात येणार आहे. त्याभाेवती संरक्षण भिंतीसह फिल्टरेशन प्लांट बसवण्यात येणार आहे.