या समासात श्रीसमर्थ माणूस जन्माला येण्यापूर्वी मातेच्या उदरी गर्भात असताना त्या गर्भवासाची स्थिती कशी दु:खदायक असते हे सांगतात. पूर्णपणे मातेवर अवलंबून असलेला जीव त्या अवस्थेमध्ये काेंडलेला आणि घुसमटलेला असताे. ताे त्यातून मुक्त हाेऊन माेकळ्या जगात प्रवेश करण्याची तीव्रतेने वाट पाहत असताे. त्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करून म्हणत असताे की, मला यातून लवकर मुक्त कर म्हणजे मी जन्मास आल्यानंतर उत्तम वागून जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता करून घेईन आणि श्रीसमर्थांच्या शब्दाततरी मी स्वहित करीन। गर्भवास हा चुकवीन। पुन्हा न ये येथे।। अशी त्याची प्रार्थना ऐकून परमेश्वराच्या कृपेने जेव्हा जन्माची वेळ येते तेव्हाही ती सुखाची नसते.
मातृत्व म्हणजे माता आणि बाळ दाेघांचाही पुनर्जन्मच असताे. त्या खटपटीत ताे जीव प्रत्यक्ष जन्मास येताना स्वत्व व परमेश्वराचा आपण अंश आहाेत हे सत्य विसरून जाताे.जन्मापूर्वी गर्भवासात त्याला हे ज्ञान असते व ताे साेहं म्हणजे मी ताेच म्हणजे परमेश्वर आहे असे म्हणत असताे. पण, जन्माला आल्यावर मात्र त्या ज्ञानाचे विस्मरणाने काेहं म्हणजे की काेण आहे असे म्हणू लागताे. म्हणजेच परमेश्वराशी असलेले आपल्या आत्म्याचे नाते विसरून जाऊन स्वत:चे शरीर म्हणजेच मी अशा अज्ञानात गुरफटून जाताे.