‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा उपयाेग देशी गाईसाठीही करून घ्यावा

21 Aug 2021 15:37:47
 
 
गाईला काेणती व्याधी हाेण्याची शक्यता काय आहे, त्याची काळजी कशी घ्यायची, याचेही मार्गदर्शन त्यातील यंत्रणेतून मिळणार आहे.त्या गाईंच्या गाेठ्याची साफसाई राेबाेट यंत्रणेच्या वतीने हाेणार आहे.
(भाग : 1479)
 
 

cow_1  H x W: 0 
या देशातील गाईच्या दूधनिर्मिती व्यवसायाचे अद्ययावत केंद्र म्हणजे काऊ एक्सलन्स सेंटर हिमाचल प्रदेशात सुरू हाेत आहे. ते केंद्र युराेपीय गायींबाबत प्रगत मानलेल्या डेन्मार्क सरकारने पुरस्कृत केले आहे.दूध निर्मिती व्यवसाय म्हणजे गाईंचे दिवसभराचे सर्व प्रकारचे व्यवस्थापन, गाेठा व्यवस्थापन अद्ययावत ठेवण्यातील ते प्रगत केंद्र आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तेथील जनावरांच्या आराेग्यासंदर्भातील पूर्वसूचना व्यवस्थापनाला मिळत राहतील, या संदर्भात त्याला महत्व आहे. हे सारे काम राेबाेटच्या सहाय्याने हाेणार आहे. या विषयाचे सार तंत्रज्ञान हे डेन्मार्कच्या वतीने देण्यात येणार आहे. त्या सरकारच्या वतीने दाेनशे गाईही देण्यात येणार आहेत. राज्य सरकार त्याला दहा हेक्टर जमीन देणार आहे. या व्यवस्थापनात गाईंचा चारा ठरविणे, त्यांच्या धारा काढणे या बाबी तर राेबाेट करणारच आहे. गायींच्या दुधातील फॅट आणि प्राेटीन यांचे प्रमाण थाेडे जरी बदलले तरी त्यांच्या आहारात त्वरित बदल करण्याचे काम त्याच्या व्यवस्थापनातील संगणक करणार आहे.
 
त्याचप्रमाणे एखाद्या गाईचे दूध सदाेष आढळले तर त्याचे निराळे संकलन करणे आणि त्याचे स्वरूप सांगणे हे कामही स्वयंचलित यंत्रणेच्या आधारेच हाेणार आहे. गाईंचे आराेग्य तपासणी साहजिकच हाेणार आहे. त्यातही गाईला काेणती व्याधी हाेण्याची शक्यता काय आहे, त्याची काळजी कशी घ्यायची, याचेही मार्गदर्शन त्यातील यंत्रणेतून मिळणार आहे. त्या गाईंच्या गाेठ्याची साफसाई राेबाेट यंत्रणेच्या वतीने हाेणार आहे.यावरील माहिती देताना हिमाचल प्रदेशचे पशुपालन निदेशक डाॅ. अजमेर सिंह डाेगरा यांनी सांगितले की, याबाबतचा भारत सरकार आणि डेन्मार्क सरकार यांच्यातील करार एमओयू- मेमाेरॅण्डम् ऑफ अंडरस्टॅन्डिंग पुढील कांही दिवसात हाेणार आहे.कृषि क्षेत्र आणि दूध व्यवसाय क्षेत्र यातील नव्या पिढीने याकडे फक्त एक बातमी म्हणून बघू नये, तर पुढे घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवावे. काही वर्षांनी ते तुम्हालाही उभे करता येणे शक्य हाेणार आहे.
Powered By Sangraha 9.0