दक्षिण मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पाॅइंट, मरिन ड्राइव्हचा अथांग सागर, वीरमाता जिजाबाई भाेसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आदी पर्यटनस्थळांत आता जंगल सफरीचीही भर पडणार आहे. वृक्षवल्लींनी नटलेल्या मलबार हिल टेकडीवर जंगल सफारीचा आनंद घेता येणार आहे. मलबार हिलवरील बी. जी.खेर मार्गावरील कमला नेहरू पार्कजवळून एक रस्ता टेकडीवरून थेट खाली गिरगाव चाैपाटीवरील तांबे चाैकात पाेहाेचताे. टेकडीवरील खाचखळग्यांचा त्रास हाेऊ नये म्हणून तेथे पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. देखभालीअभावी काही पायऱ्यांचे नुकसान झाले आहे. वृक्षवल्लीतून ही मार्गिका जाते.भुरटे चाेर, समाजकंटकांच्या भीतीमुळे फारशी मंडळी या वाटेला जात नाहीत.वृक्षवल्लींनी नटलेल्या या टेकडीवर पर्यटकांना छाेटेखानी जंगल सफर घडवण्यासाठी सुविधा उभारण्याचा निर्णय पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाने घेतला आहे.