आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांचे अधिकाऱ्यांना आदेश : नालेसफाई 31 मेपर्यंत पूर्ण करा
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सी 1 वर्गवारीतील अतिधाेकादायक इमारती खाली करून त्यावर तत्काळ कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी सर्व सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांना दिले. त्याचबराेबर शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई 31 मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिल्या. शहरात पावसाळ्यात धाेकादायक इमारतींमुळे काेणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, यासाठी आयुक्त डाॅ. शर्मा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रभाग समितीनिहाय सी 1, सी 2 आणि सी 2 अ गटातील धाेकादायक इमारतींचा आढावा घेतला. प्रभाग समितीनिहाय धाेकादायक इमारतींची यादी ठाणे महापालिक यापूर्वीच जाहीर केली आहे.
लाेकमान्यनगर- सावरकरनगर, कळवा, माजीवाडा-मानपाडा, दिवा, मुंब्रा, उथळसर, वर्तकनगर, नाैपाडा आदी प्रभाग समितीतील अतिधाेकादायक सी 1 इमारती खाली करून तत्काळ ताेडून टाकण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत. सध्या रस्त्यांच्या दुरुस्तीची जी कामे सुरू आहेत, ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे, तसेच घनकचरा विभागातर्फे प्रत्येक प्रभागनिहाय साफसफाई करण्यासाेबत शहरातील संपूर्ण नालेसफाई 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश या वेळी देण्यात आले. शहरात जेथे चेंबरवर झाकणे नाहीत, तेथे तत्काळ चेंबरची झाकणे बसवणे, चर बुजवणे व खड्डे बुजवण्याच्या सूचनाही सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या. दरम्यान, ताैक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवर पावसाच्या पाण्याने कचरा वाहून आला असून, झाडांच्या पडलेल्या फांद्या, कचरा तत्काळ उचण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.