गेट वे ऑफ इंडिया’च्या तटबंदीला धक्का

21 May 2021 13:08:43
 
ताैक्ते  चक्रीवादळामुळे निखळले  धक्क्याचे दगड
 

cyclone_1  H x  
भारताचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या मुंबईतील अपाेलाे बंदर भागातील पुरातन वारसा वास्तूचा दर्जा लाभलेल्या गेट वे ऑफ इंडिया परिसराचे ताैक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. गेट वे ऑफ इंडियालगत समुद्राला तटबंदी रूपात उभारलेल्या ध्न्नयांचे भलेमाेठ्ठे दगड लाटांच्या माऱ्याने निखळले आणि दूर जाऊन पडले. गेट वे ऑफ इंडियाभाेवती सुशाेभीकरणासाठी उभारलेल्या कठड्याचा काही भागही लाटांच्या माऱ्यात निखळून पडला. ब्रिटनचे राजे पंचम जाॅर्ज आणि राणी मेरी यांनी 1911 मध्ये भारताला भेट दिली हाेती. या भेटीचे स्मारक म्हणून भव्य कमान उभारण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. या कमानीची पायाभरणी 31 मार्च 1913 राेजी करण्यात आली आणि 1924 मध्ये ही वास्तू उभी राहिली. या वास्तूची रचना इंडाे-सारासेनिक शैलीत करण्यात आली. या वास्तूची उंची 26 मीटर (85 फूट) इतकी आहे.
 
अपाेलाे बंदर येथे उभारलेली ही वास्तू गेट वे ऑफ इंडिया या नावाने ओळखली जाऊ लागली. देश-विदेशातील पर्यटकांसाठी किनाऱ्यालगत उभे असलेले गेट वे ऑफ इंडिया आकर्षणस्थान बनले आहे. ताैक्ते चक्रीवादळामुळे समुद्र खवळला हाेता. समुद्राच्या लाटा राैद्ररूप धारण करून उसळत हाेत्या. उसळणाऱ्या लाटांचा मारा सतत गेट वे ऑफ इंडिया परिसरात हाेत हाेता. लाटांच्या तडाख्यामुळे गेट वे ऑफ इंडिया आणि समुद्रादरम्यान उभ्या केलेल्या तटबंदीचे दाेन प्रचंड माेठे दगड निखळून दूर फेकले गेले. त्याचबराेबर गेट वे ऑफ इंडियाच्या साैंदर्यात भर घालण्यासाठी भाेवती उभारलेल्या कठड्याच्या काही भागांचे लाटांच्या माऱ्यामुळे नुकसान झाले.
 
लाटांसाेबत आलेला कचरा गेट वे ऑफ इंडिया परिसरात पसरला हाेता. मुंबई महापालिकेच्या एफ विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली. तसेच, लाटांसाेबत आलेला कचराही उचलण्यात आला. महापाैर किशाेरी पेडणेकर यांनीही गेट वे ऑफ इंडियाची पाहणी केली. पुरातन वारसा वास्तूचा दर्जा लाभलेल्या गेट वे ऑफ इंडिया लगतच्या परिसराचे चक्रीवादळामुळे नुकसान झाले असून, त्याच्या पाहणीचे आदेश देण्यात आले आहेत. काेराेनामुळे सध्या केवळ 15 टक्के कर्मचारी कार्यालयात उपस्थित असतात. त्यामुळे पुढील आठवड्यात गेट वे ऑफ इंडिया परिसराची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्ती करण्यात येईल, असे पुरातत्त्व विभागाचे संचालक डाॅ. तेजस गर्गे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0