आजी-आजोबा झाल्यावर कसे जगायचे आणि कसे जगायचे नाही, याचा वेध ललित लेखक भा.ल. महाबळ यांनी माझे तुमचे या पुस्तकात घेतला आहे. त्यांनी २०१२ ते २०१८ या काळात विविध दैनिकांमध्ये लिहिलेल्या सदरांचा हा संग्रह आहे. वृद्धापकाळ हा गेली काही वर्षे लेखकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयाकडे तो कुतूहलाने पाहतो. त्यासंबंधी त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे वाचनीय आहेत.
मोकाशींनीही आपले स्वर्गीय, जन्मजन्मांतरीचं प्रेम जमवायचे सहा अयशस्वी प्रयत्न शाळेपासून ते नोकरीच्या प्रारंभी प्रारंभी केले होते. शेवटी वधू-वर सूचक मंडळ व आई-वडिलांची सालस व सज्जन ही ख्याती या जोरावर त्यांना पत्नी मिळून गेली. 'ओक, प्रौढ वयातील आई व पत्नी अशा पक्व व्यक्तींचं कोणत्या कारणास्तव भांडण होत असेल?' गोंधळेकरांनी विचारलं. 'मला कल्पना नाही. मी विचारलं नाही, मोघ्यांनी आपणहून मला काही सांगितलं नाही. मोघे मला एकदा म्हणाले होते, 'मला एकच बायको आहे व एकच आई आहे. मला कोणालाच दुखवायचं नाही. त्यामुळे मी दोघींच्या भांडणात न्यायाधीश होण्याच्या भानगडीत पडत नाही. मी एक पुस्तक घेतो व रणांगण सोडतो. पुन्हा घरात शिरण्यापूर्वी शांतता प्रस्थापित झाली आहे याची खात्री करून घेतो. दोघींचं भांडण चालू झालं की मी घर सोडतो हे दोघींना समजलं आहे. माझ्यावरच्या लोभापोटी दोघीही भांडण आवरतं घेत असणार.'
माझ्या मते मोघे शहाणे आहेत.' ओकांनी माहिती दिली. मोकाशी म्हणाले 'भांडण कशावरून होत असतील याचा आपण अंदाज सहज बांधू शकतो.' 'बांधा, अंदाज बांधा.' परबांनी आव्हान दिलं. मोकाशींनी अस्खलितपणे अंदाज बांधायला प्रारंभ केला. 'मोघ्यांना कोल्हापूरची, गोरीपान व पाहता क्षणी ती नम्र, सुशील व सुगरण आहे हे कळावं अशी मुलगी सांगून आली होती. मोघ्यांना तीच मुलगी पसंत होती. पण तिला एसएससीला गणितात काठावर मार्क होते म्हणून वडिलांनी ती नाकारली. मोघ्यांच्या आईलाही गणित संस्कृत न येणारीच सून हवी होती. सध्याची सून ग्रॅज्युएट आहे. ती आईला नापसंत आहे. दोघींची खडाजंगी उडणारच.' ओकांनी अडवलं, 'मोकाशी, हा कसला अंदाज? मोघ्यांचा प्रेमविवाह आहे, हे मी मघाशीच सांगितलं आहे.' परबही आडवे आले, 'कोल्हापूरची मुलगी गोरीपान होती हे ठीक आहे, पण पाहता क्षणी मुलगी नम्र, सुशील व सुगरण आहे हे कसं काय दिसले?' मोकाशी बोलत सुटले, 'मी अंदाज सांगतो आहे. मोघ्यांना सांगलीच्या मोठ्या घाऊक तांदूळ व्यापाऱ्याची मुलगी सांगून आली होती. दोन्हीकडचा लग्नखर्च, वरती हुंडा देऊन लग्न लावून देणार होते, वरती आयुष्यभर ते दर वर्षाला, जुन्या आंबेमोहर तांदळाचं एक पोतं घरपोच करणार होते.
सध्याच्या सुनेमुळं, तांदळाच्या पोत्याचं आयुष्यभर नुकसान झालं याचा मोघ्यांच्या आईला त्रास होत असणार. त्या तो बोलून दाखवणारच! पण यात मोघ्यांच्या पत्नीचा काहीच दोष नाही; मोघ्यांच्या पत्नी उलट उत्तर देणार, त्या का ऐकून घेतील? आणखी एक भांडणाचं कारण सांगतो. मोघ्यांच्या मातोश्रींनी आयुष्यभर कष्ट करून, काटकसरीनं तांब्या-पितळेचे हंडे, स्वयंपाकाची भांडी, ताटवाटी, तांबे हे सारं जमवलं होतं. मोघ्यांच्या पत्नीनं काय केलं, तर सासूबाईंची सर्व भांडी मोडीत टाकली व लोखंडाची चकचकीत भांडी जमा केली. तुम्ही म्हणाल स्टेनलेस स्टील, पण ती लोखंडाचीच भांडी आहेत! या भांड्यावरून सासू व सून भांडणारच. 'गावात माहेर असलेली बायको करू नको, एक तर तिची माहेरची माणसं आपल्याला चिकटतात किंवा तुझी बायको सारखी माहेरी पळेल' असं प्रत्येक आईनं मुलाला बजावलेलं असतं. पण मोघ्यांनी काय केलं? गावातील मुलगी केली, आईचा सल्ला जुमानला नाही. परिणाम? मातोश्री व पत्नी यांच्या भांडणामुळं मोघ्यांना घर सोडावं लागतं.' 'मोकाशी, थांबा थांबा मोघ्यांचा प्रेमविवाह आहे. पण दोघं एका गावातील नाहीत, ते एका कॉलेजात होते. एक सांगलीकर व दुसरा पंढरपूरचा.' ओकांनी थांबवले.
- भा. ल. महाबळ फोन : ०२२-२१६३१९४० (क्रमश:)