आजोबांची खेळणी

03 May 2020 14:18:44
 
 
त्या फलकाकडे पाहून गोंधळेकर व मोकाशी हे दोन अतिवयस्क आजोबा ओळीनं तीन दिवस, हं! आता तीन महिने खेळणी नाहीत. असं म्हणत उसासे टाकू लागले. ओकांना प्रचंड आश्चर्य  वाटलं. तिसरे दिवशी न राहवून ओक म्हणाले, म्हातारपण हे दुसरं बालपण आहे, असं म्हणतात ते मला माहीत आहे, म्हणून खेळण्यांचा विभाग बंद झाला यासाठी तुम्हाला उसासे टाकायचं कारण काय? खेळण्यांच्या विभागात जाण्याकरिता वयाची अट आहे, वय वर्षे ३ ते १०. हं, आता आपल्या आयुष्यात उरलेली वर्षे मोजली तर आपण त्या वयात मोडू. तरीही उपयोग नाही. खेळण्यांच्या विभागाकडं जायला चार पायऱ्या उतराव्या लागतात. त्या आपण कोणाच्याही आधाराशिवाय उतरू शकतो का? नाही, म्हणून काय झालं? आपण बाजूच्या भिंतीवर बसून खेळणी पाहत होतो. ती आता पाहायला मिळणार नाहीत. गोंधळेकर कष्टी आवाजात म्हणाले.
 
पुढच्या कोलमडत्या वयात, म्हाताऱ्यांचे देह व त्याहून त्यांची मनं डुगडगत असतात. त्यांना शब्दांचे आधार देऊन सावरावं लागतं हे ओकांना, ते स्वत:ही चौर्याऐंशी वर्षाचे  असल्यानं, स्वानुभवातून माहीत होतं. ओकांनी प्रयत्नपूर्वक वेगळा समजुतीचा आवाज काढला, गोंधळेकर बारा आठवड्यांचाच तर प्रश्न आहे. बारा आठवडे? सूचना फलकावर काय लिहिलं आहे त्यावर जाऊ नका. काम चालू होईपर्यंत बारा आठवडे निघून जातील. मोकाशी ओरडले. ठीक आहे, ठीक आहे. बाराच्या ऐवजी वीस आठवडे धरा. ओकांनी आपल्या दोन समवयस्क मित्रांशी जमवून घेतलं. अरे वा रे वा, म्हणजे वीस आठवडे आम्हा वृद्धांना आमच्या खेळण्यांपासून दूर ठेवणार? गोंधळेकरांनी पाठींबा  दिला. आपल्या दोन्ही मित्रांच्या मेंदूत काही गंभीर उलथापालथ झाली आहे याची ओकांना स्पष्ट कल्पना आली. लहान मुलाशी बोलतात त्या गोंजारणाऱ्या सुरात ते म्हणाले, हे पाहा, खेळणी मोडली आहेत म्हणजे ती दुरुस्त करायलाच हवीत.
 
घसरगुंड्यांचे पत्रे फाटले आहेत, स्क्रू वर आले आहेत, घसरणाऱ्या मुलांना खरचटले, त्यांना जखम होईल. ते तुम्हाला पाहवेल का? हा खेळण्यांचा विभाग बंद आहे; त्यामुळं खरं तर लहान मुलं व त्यांच्या आयांनी इथं हिरमुसून बसायला हवं. तुम्ही दोघं एवढे व्याकूळ का? बरं, आपली नातवंडं बावीस, पंचवीस वर्षे वयाची आहेत, ती काही ३ ते १० या वयातील नाहीत. तात्पर्याने बोलायचं तर तुम्हा दोघांना उदास होण्याचं काहीही कारण नाही. तात्पर्याने  बोलायचं तर तुम्ही मूर्ख आहात. ओक, तुम्हाला आमचं दु:खच समजलं नाही. काही आठवडे खेळण्याचा विभाग बंद म्हणजे या विभागात आमची पतवंडेच जणू अशी लहान बाळं येणार नाहीत, त्यांच्यावर चांदण्याची पण करडी नजर ठेवणाऱ्या त्यांच्या आयाही दिसणार नाहीत.
 
 
बागेत खेळण्यांच्या विभागासमोरच्या भिंतीवर आम्ही मुक्काम  ठोकून का बसतो? मोकाशींनी प्रश्न टाकला. का? ओकांनी विचारलं. ओक, इथं खेळणारी मुलं ही आमची जीवनदायी, चैतन्य पुरवणारी औषधं आहेत. ओक, घसरगुंडीवरून कोणी एक छोटुला सात वर्षांचा दादा घसरत खाली येतो, त्याची सानुली तीन वर्षांची बहीण, दादाचा पराक्रम आईच्या खांद्यावरून पाहत असते. दादा, दादा म्हणून ती चिमुकल्या हाताने टाळ्या पिटून दाद देते. दादा तिच्याजवळ जातो. पिनू म्हणत तिचा फुलासारखा हात आपल्या हातात घेतो, तुला पुन्हा घसरून दाखवतो, असं सांगून दादा घसरगुंडीच्या मागच्या बाजूला शिडीकडे जातो.।
(क्रमश:)
Powered By Sangraha 9.0