काही देशांनी प्लॅस्टिक वापरावर बंदी घातली असली, तरी जगात प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे बंद झालेला नाही. त्यामुळे पृथ्वीच्या पाठीवर आजही अब्जावधी टन कचऱ्याचे ओझे आहेच. गेल्या ७० वर्षांत पृथ्वीवर ८.३ अब्ज मेट्रिक टन प्लॅस्टिक कचरा तयार झालेला आहे; पण या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची ही मोठी समस्या आहे.
अमेरिकेतील जार्जिया विद्यापीठाच्या प्रोफेसरांनी सांगितले की, १९५० ते २०१५ या ६५ वर्षांत जगात ८.३ अब्ज मेट्रिक टन कचरा माणसांनी तयार केला आहे. यापैकी ६.३ अब्ज टन प्लॅस्टिक कचऱ्याचा ढीग पडून आहे. कारण एकूण कचऱ्याच्या फक्त ९% कचरा रिसायकल करण्यात आला आहे. तर १२% कचरा जाळून नष्ट करण्यात आला आहे. पण ७९% कचरा अजून शिल्लकच आहे व त्यात रोज नवी भर पडत आहे.
जर यापुढेही अशाच वेगाने प्लॅस्टिक कचरा तयार होत गेला, तर सन २०५० पर्यंत जगात १२ अब्ज मेट्रिक टन कचरा तयार होणार आहे. हा कचरा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय धोकादायक ठरू शकतो. १९५० मध्ये जागतिक पातळीवर प्लॅस्टिक कचऱ्याचे उत्पादन गेल्या ६५-७० वर्षांत मोठ्या प्रमाणावर झाले. तरीही आजच्या तुलनेत हे उत्पादन फक्त २० लाख मेट्रिक टन होते. २०१५ पर्यंत हा कचरा ४० कोटी मेट्रिक टन तयार झाला. गेल्या ५ वर्षांत त्यात आणखी भर पडली आहे. २०१० पर्यंत महासागरांमध्येच ८० लाख मेट्रिक टन कचरा सापडला आहे.
हजारो वर्ष टिकतो - जार्जिया विद्यापीठाच्या प्राध्यापिका जेना जेमबॅक यांनी असे प्रतिपादन केले आहे की, बहुतेक प्लॅस्टिक कचऱ्याचे जैविक क्षरण (झीज) होत नाही. त्यामुळे हा कचरा शेकडो नव्हेतर हजारो वर्षे नष्ट होत नाही. यामुळे जागतिक पातळीवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रभावी पद्धत शोधण्याची गरज आहे.