असलं डेंजर क्वारंटाइन नको रे बाप्पा!

11 May 2020 12:22:47



एखाद्या शाळेतून मुलं सोडली जात असतानाच कोरोनाचे रोगी आढळल्यामुळे ती सील केली गेली आणि तिच्यात प्रिन्सिपल आणि काही मुलं क्वारंटाइन झाली तर अनवस्था प्रसंग ओढवेल? मुलं म्हणतील आम्ही कोरोनाचा धोका पत्करतो पण आम्हाला बाहेर सोडा.

 
टाळेबंदीमुळे लोक शरीराने बंदिस्त झाले असले तरी त्यांची मनं मुक्त आहेत. त्यांना अफलातून कल्पना सुचतायत टाइमपासच्या. त्यांच्या कल्पनाशक्तीला किती उधाण आलेलं आहे ते टिकटॉकसारख्या अ‍ॅप्सवर दिसून येतं. लोकांनी धमाल उडवून दिली आहे तिथे मौजमस्तीची. इथेही अशातलाच एक उद्योग आहे.

ही मुलं आणि त्यांचे वडील यांनी मिळून एक लाइव्ह गंमतचित्र तयार केलं आहे. ही मुलं त्यांच्या हातातल्या फलकांच्या साह्याने प्रश्न विचारतायत की टाळेबंदीमुळे आपल्यावर फार मोठी कुऱ्हाड कोसळली आहे, आपल्याला फार त्रास भोगावा लागतोय, आपल्याइतक्या यातना कुणालाच भोगाव्या लागत नाहीयेत, अशी तुमची समजूत आहे का? मग शाळेच्या प्रिन्सिपलबरोबर क्वारंटाइन होऊन पाहा. शेजारी त्यांचे वडील प्रिन्सिपल असल्यासारखे हे बोर्ड वाचतायत आणि त्यांच्या चेहऱ्यावर खतरनाक भाव उमटलेले आहेत. 

 
हे सगळं अर्थातच मस्करीसाठी बनवण्यात आलेलं आहे, पण गंमतीतही असा विचार करून पाहा बरं. अंगावर काटाच येईल. समजा, एखाद्या शाळेतून मुलं सोडली जात असतानाच कोरोनाचे रोगी आढळल्यामुळे ती सील केली गेली आणि तिच्यात प्रिन्सिपल आणि काही मुलं १४ दिवसांसाठी क्वारंटाइन झाली तर अनवस्था प्रसंग ओढवेल? मुलं म्हणतील आम्ही कोरोनाचा धोका पत्करतो पण आम्हाला बाहेर सोडा. अर्थात आता घराघरात आईवडिलांनीही सतत अभ्यास करायला सांगणाऱ्या कठोर प्रिन्सिपलचंच रूप धारण केल्यामुळे तिथेही फारसा आधार उरलेला नाही!
Powered By Sangraha 9.0