आजोबांनाही व्हायचंय कॅशलेस

01 May 2020 15:55:55
 
 
आम्हा ८० ते ८५ वयातील आजोबांचे उद्यान मंडळ आहे. आम्ही सार्वजनिक उद्यानात रोज जमतो. तसे हे उद्यम मंडळच आहे. रहदारीचे दोन रस्ते ओलांडून बागेत येणं, विश्वातील समस्यांचा विचार करणं, पुन्हा रस्ते पार करून आपापल्या घरी हातीपायी धड पोहोचणं हा तसा उद्यमच आहे. आम्ही घरी नीट पोहोचलो की, रस्त्यावरचे रिक्षावाले व घरची सर्व मंडळी नि:श्वास सोडतात. येत्या कित्येक दिवसांचा आमच्या चर्चेचा व चिंतेचा विषय आहे, काळा पैसा नाहीसा करण्यासाठी पंतप्रधानांनी आणलेली ५०० व हजार रुपयांच्या नोटांवरची बंदी. आम्ही आजोबा पक्षनिहाय विचार करणारे नाही. काळ्याला काळे व पांढऱ्याला पांढरे म्हणणारे आहोत. भगवा, निळा, तिरंगी असा कोणताही झेंडा हाती धरून आम्ही निर्णय ठरवत नाही. एक झेंडा, एक तत्त्वज्ञान हा विचार आता उरलेला नाही. एकच व्य्नती एकाच वर्षांत, केवळ अधिकाराचे पद मिळावे म्हणजे चार पैसे जोडावेत या उद्देशाने खांद्यावर दोनचार वेगळे झेंडे घेऊन नाचते हे आम्ही आजोबा पाहत आहोत.
 
आम्ही आजोबा वृत्तपत्रांचे वाचन करतो. नातवंडांच्या गैरहजेरीत टीव्हीचा रिमोट आमच्या हाती येतो. त्यामुळे लोकसभा-राज्यसभांतील तुंबळ गोंधळ, वाहिन्यांवरचे वादविवाद, शेतकरी-कामगार-फेरीवाले-मजूरछोटे व्यापारी-शहरी मध्यमवर्ग यांच्या मुलाखती आम्ही आजोबा पाहू व ऐकू शकातो. खालील मुद्दे आम्हाला स्पष्ट झाले आहेत. १) काळा पैसा नाहीसा करण्याच्या अनेक उपायांपैकी जास्त किमतीच्या जुन्या नोटा रद्द करणे हा उपाय देशाला हितकारक म्हणून योग्य आहे आणि तो जनतेला मान्य आहे. २) याचबरोबर देशबुडव्यांनी आपला काळा पैसा, सोने, भूखंड, इमारती यामध्ये व परदेशात दडवला आहे. अशा बेहिशोबी संपत्तीवरही सरकारने उपाययोजना चालू ठेवली पाहिजे. ३) खेड्यांत, गावांत, बाजारांत व शहरांतही कितीतरी व्यवहार रोखीने व मुख्यत्वे १०-२०-५०-१०० अशा लहान किमतीच्या नोटांत होतात. पाचशे-हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द झाल्या; पण त्या बदल्यात जनतेला की किमतीच्या नोटांचा तुल्यबळ पुरवठा मुबलक प्रमाणात ताबडतोबीने व्हायला हवा होता. तसे न घडता दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा त्याही तुटपुंज्या रांगा लावून जनतेला घ्याव्या लागत आहेत.।
(क्रमश:)
Powered By Sangraha 9.0