हात कसे धुवावेत? धुण्याची योग्य पद्धत काय?

    09-Apr-2020
Total Views |


han_1  H x W: 0

कोरोनाच्या साथीपासून वाचायचे असेल तर हात स्वच्छ धुणे आणि शास्त्रो्क्त पद्धतीने धुणे खूप आवश्यक आहे. असे तज्ज्ञ सांगतात.

अनेकांना हात धुण्याची सवयच नसते. यासाठी हात कसे धुवावेत या बाबतीत जनजागृतीसाठी १५ ऑक्टोबरला जागतिक हँड वॉशिंग डे साजरा केला जातो.

अनेक जण हात धुतातही पण नुसते पाण्याने हात धुणे म्हणजे हात स्वच्छ होतात असे नाही. योग्य पद्धतीने हात कसे धुवावेत ते जाणून घेऊ यात. प्रथम नळाच्या किंवा पाण्याच्या धारेखाली हात पाण्याने ओले करावेत. त्यानंतर साबण हातावर घेऊन किमान २० सेकंद हातावर चोळावा. साबण हाताना चोळण्याच्या काही पद्धती आहेत. तळहात ते तळहात बोटांमधील बेचक्या दोन्ही हातांच्या बाहेरील बाजू अंगठ्याच्या तळाची आतील बाहेरील बाजू बोटांची बाहेरील बाजू नखे मनगटे शेवटी पुन्हा नळ सोडून हाताला आलेला फेस पूर्णपणे पाण्याखाली निघून जाईपर्यंत धुवावेत. नळ बंद करून स्वच्छ टॉवेल किंवा रुमालाने कोरडे करावेत.

साबणाने धुणे आवश्यक का आहे?

साबणात मेदासारखे अ‍ॅम्फीफाइल्स घटक असतात. त्यातील काही विषाणूच्या मेदावरणासारखे असतात. साबणाचे रेणू हे त्या मेदावरणासाठी झटापट करून त्याचे सुरक्षाकवच असलेले मेदावरण तोडतात. साबणाने घट्ट चिकटलेला विषाणू त्वचेपासून सैल होतो. विषाणू हा वेलक्रोप्रमाणे प्रथिने मेद व आरएनए या सह चिकटलेला असतो. त्याची ती चिकाटी साबणाच्या पाण्याने गळून पडते.

सॅनिटायझर योग्य की साबण?

कोरोना व्हायरस सॅनिटायझरनेच जातो असा समज करून अनेकांनी महागड्या सॅनिटायझरवरच भर दिला आहे. सॅनिटायझर आणि साबण यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. सॅनिटायझर हे अल्कोहलवर आधारित असते. त्यात ६० ते ८० ट्क्के इथॅनॉल असते. त्यामुळे साबणाप्रमाणेच विषाणू निष्क्रिय केले जातात. पण साबण हा त्यापेक्षा जास्त प्रभावी ठरतो. साबणाने हात चोळून धुतल्यास विषाणूचे तुकडे व निर्जीव होतात. सॅनिटायझर वापरताना तो विषाणू इथॅनॉलमध्ये काही काळ राहिला तरच निष्क्रिय होतो. त्यामुळे सॅनिटायझर योग्य प्रकारे वापरले तरच अपेक्षित परिणाम साधला जातो. जेलमध्येही ते चोळून लावले तरी त्याचा फारसा फायदा होईल असे नाही. त्यामुळे साबण योग्य ठरतो परंतु काही ठिकाणी आपण साबण वापरू शकत नाही तिथे सॅनिटायझर वापरणे योग्य असते.