'कुटुंब म्हणजे काय हे मला आज समजलं आहे. कुटुंबप्रमुखाची जबाबदारी ही किरकोळ बाब नाही.' मोकाशींनी उद्यानातील संध्याकाळच्या चर्चेचा भारदस्त प्रारंभ केला. ओक म्हणाले, 'कुटुंब म्हणजे पाच-सात जणांचा, शहरातील जागेच्या वाढलेल्या प्रचंड किमतीमुळे नाइलाजाने एकत्र राहणारा गट. यापैकी फक्त एक- दोनच पैसे कमावतात. गटातील बाकीचे पैसे घरी येण्यापूर्वीच ते कसे खर्च करायचे हे ठरवतात.' मोकाशी उत्तरले, 'विषय गंभीर आहे. गंमत म्हणून मी बोलत नाही.' 'गंभीर तर गंभीर! मी व्याख्या बदलतो. ज्या मंडळींकरिता धडपडून पैसे मिळवावेत असे एकाला वाटते ती व्यक्ती म्हणजे कुटुंबप्रमुख व ती मंडळी म्हणजे कुटुंबीय. मोकाशी कुटुंबप्रमुख म्हणजे काय हे तुम्हाला समजलं हे छान घडलं. आपलं वय त्र्याऐंशी आहे. पुढील सतरा वर्षे तरी प्रमुखाप्रमाणे वागा, पूर्वायुष्यातील चुका दुरुस्त करा.' ओक, करा, तुम्ही टिंगल करा. देशात सर्वत्र फाटाफुटीचं वातावरण आहे, अशा वेळी कुटुंबात एकोपा टिकवणं ही अवघड कसरत आहे.
भक्कम कुटुंबप्रमुख असेल तरच कुटुंब एकमुखी राहतं.' 'बरोबर. कुटुंबातील सर्वांनी मुखानं सतत 'विठ्ठलऽ विठ्ठलऽ' म्हणावं. वादाचे मुद्दे उच्चारायला तोंडाला सवडच देऊ नये. कुटुंब अभंग राहतं.' परबांनी सोपा उपाय सुचवला. 'समजा, घर रंगवायचं आहे. कोणता रंग द्यायचा यावरून मतभेद घडतो, मने विटतात, घरात बेरंग होतो. अशा वेळी, कोणता एक रंग द्यायचा याबाबत भक्कम निर्णय घेणारा कुटुंबप्रमुख हवा.' मोकाशींनी उदाहरण दिलं.
ओकांनी विरोध केला, 'मोकाशी, ही हुकूमशाही झाली. स्वयंपाकघर हे कसे रंगवावे हे सासू-सून ठरवतील, नातवंडांच्या मनाप्रमाणे त्यांची खोली रंगवा, हॉल कसा हवा हे मुलगा-सून ठरवतील. उरलेल्या शिल्लक 'बचतरंगात' माझी बाल्कनी रंगवा. घर बहुरंगी होईल, होऊ दे; पण सर्वांच्या मनात इच्छातृप्तीचा एक आनंदरंग भरून राहील.' ओकांनी हा नवा आनंदरंग निर्माण केला.
परबांचा वेगळाच रंग होता. ते म्हणाले, 'रंगी रंगे रे श्रीरंगे । काय भुललासी पतंगे ।। अंतकाळीचा सोयरा । तुका म्हणे विठो धरा ।।' मोकाशी अंतकाळीचा जवळचा नातेवाइक एकच विठ्ठल, श्रीरंग. त्याच्या रंगात रंगा. पतंगाच्या रंगात दम नाही. पतंग एका झाडाचे नाव आहे. त्याच्या सालीपासून रंग तयार करत असत.' ओकांनी मोकाशींना गुगली प्रश्न टाकला, 'तुमच्या घरी खरा कुटुंबप्रमुख कोण?' 'ओक, तुम्ही खुद्द मला, मिस्टर मोकाशींना, कुटुंबप्रमुखालाच घरचा कुटुंबप्रमुख कोण हा प्रश्न विचारता? दुसऱ्या मजल्यावरच्या तीन नंबरच्या ब्लॉकवरचं नाव पाहा, रद्द झालेल्या रेशनकाडावर व वीज बिलावरचं नाव वाचा. तुम्हाला सर्वत्र मै, मी स्वत:, इंग्रजीतील आय म्हणजे मिस्टर मोकाशी म्हणजे कुटुंबप्रमुख दिसेल.' 'बाप रेऽ! म्हणजे घरातील सर्व कामे, घरखर्च, दुरुस्त्या हे तुम्ही सांभाळता?' ओकांनी खोटा धास्तावलेला स्वर लावला.
(क्रमश:)
- भा.ल. महाबळ