विविध गृहनिर्माण योजनांच्या सोडतीचा निकाल जाहीर; अर्जदारांशी संपर्क साधणार
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांची यादी व भूखंडांच्या ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेंतर्गत यशस्वी ठरलेल्या बोलीधारकांना वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेंतर्गत शिल्लक असलेल्या नवी मुंबईतील खारघर येथील ८१० घरांसाठी ११ सप्टेंबर २०१९ रोजी योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेची सोडत २६ नोव्हेंबर २०१९ रोजी काढण्यात आली. त्यानंतर यशस्वी अर्जदारांची कागदपत्र पडताळणी करून पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी २६ एप्रिलला www.cidco.nivarakendra.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याचबरोबर पुढील प्रक्रियेबाबत अर्जदारांना लवकरच कळविण्यात येईल. गृहनिर्माण योजना ऑगस्ट-२०१८ अंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमधील १४८३८ परवडणाऱ्या घरांची योजना १३ ऑगस्ट २०१८ रोजी जाहीर करण्यात आली होती. त्या योजनेची सोडत २ ऑक्टोबर २०१८ रोजी काढण्यात आली व यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र अर्जदारांना वाटपपत्र देण्यात आले. तथापि, काही अर्जदारांनी घरे सरेंडर किंवा रद्द केली तर काही अर्जदार कागदपत्रे छाननी अंतर्गत अयशस्वी ठरल्याने प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना संधी देण्यात आली.
प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची कागदपत्र पडताळणी करून पात्र अर्जदारांची अंतिम यादी २६ एप्रिलला जाहीर करण्यात आली असून, ही यादीही www.cidco.nivarakendra.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील वाटपपत्राची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे सिडकोने स्पष्ट केले आहे. ज्या सदनिकाधारकांना पाचवा हप्ता भरतेवेळी टाळेबंदीमुळे अडचण आली अथवा ते हप्ता भरू शकले नाहीत, अशा सदनिकाधारकांना यापूर्वीच ३० जूनपर्यंत सदनिकेचा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.