आमची वये मुद्दामच लिहिली. तुझे आई-वडील म्हातारे झालेले आहेत हे तुला कळावं म्हणून. मुळात आम्ही छोट्या हाऊसिंग सोसायटीत सुखाने राहत होतो. तू शिकून अमेरिकेत नोकरी करत होतास. मधेच केव्हा तरी तू मला लिहिलेस, तात्या, अमेरिका सोडून कायमच्या वास्तव्यासाठी मी तुमच्यासाठी परत येतो आहे, पत्नी- मुलांसकट. आपली सध्याची जागा लहान पडेल. मी अॅमेझॉन कॉम्प्ले्नसमध्ये टॉवर क्रमांक आठमध्ये तीन बेडरूम-हॉल- किचन असा मोठा ब्लॉक खेरेदी केला आहे. मी किशोरला कळवले आहे. तो येईल, तुमचं सामान, तुमच्यासह, तो नवीन अपाटमेंटमध्ये हलवेल. आपला जुना ब्लॉक विकण्याचा व्यवहार ही किशोर व मी पाहू. विक्रीच्या रकमेचे पैसे तो तुमच्या बँक खात्यात जमा करेल. तुम्ही नव्या ठिकाणी गेल्यावर, स्थिरस्थावर झाल्यावर मला कळवा, त्यानंतर आम्ही सारे तेथे पोहोचू.फ आम्ही अॅमेझॉन, टॉवर-८ मध्ये गेलो, त्या गोष्टीला पुरी पंधरा वर्षे झाली! तू अमेरिकेहून काही परतला नाहीस. काही तरी कारणे तू देत राहिलास; पण खरे कारण मला समजले होते. मला खरे कारण कळले आहे हे तुला ही समजले होते. आपल्या आई-वडिलांनी काड्यापेटीच्या आकाराच्या जुन्या ब्लॉकमध्ये न राहता, आलिशान कॉम्प्ले्नसमध्ये, प्रशस्त ब्लॉकमध्ये राहावं, अशी तुझी इच्छा होती. या पंधरा वर्षांत, ब्लॉकसाठी मला एक रुपयाचीही तोशीस पडली नाही. सर्व आर्थिक भार तू परस्पर सांभाळत होतास.
तसे पाहिले तर पंधरापैकी पहिली दहा वर्षे, ऐसपैस जागेचा व कॉम्प्ले्नसचा आनंद आम्ही उपभोगलाही; तरीही आम्ही वृद्धाश्रमात दाखल झालो आहोत. का सांगतो. एवढा मोठा ब्लॉक, स्वच्छ व व्यवस्थित कसा राखायचा? गडीमाणसे होती, त्यांचा पगार ही परस्पर तुझा मित्र किशोर देत होता; पण त्यांच्याकरिता त्यांच्या वेळेप्रमाणे ब्लॉकचे दार उघडणं, बंद करणं हे आम्हालाच करावं लागत होतं. आम्हाला लागणारे अन्नपदार्थ, इतर वस्तू कॉम्प्ले्नसच्या आवारातील दुकानातून मलाच आणाव्या लागत होत्या. त्यासाठीही माणूस नेमता आला असता, पण पुन्हा दार उघडणं, यादी देणं, दार बंद करणं, पुन्हा दार उघडून वस्तू घेणं, पुन्हा दार बंद करणं हे आम्हा दोघांनाच करावं लागलं असतं. आणि येणारे-जाणारे पाहुणे, नातेवाईक? त्यांचं काय? आमच्या पूर्वीच्या सामान्य, छोट्या घरात फारसं कोणी येत नव्हतं. त्या घरात सोय अशी काही नव्हतीच. वरती गैरसोयी भरपूर होत्या. टॉवरमधल्या श्रीमंती ब्लॉकमध्ये भरपूर जागा, छान, सोयी व त्यामुळे पाहुणेच पाहुणे! तू व मंदा येथे असता तर तुम्ही पाहुण्यांची उठबस केली असती. पाहुण्यांच्या बरोबर आम्ही दोघांनी थोडा वेळ गप्पा मारल्या असत्या. मंदानं केलेला आयता चहा घेतला असता आणि आमच्या खोलीत निघून गेलो असतो. आमचा वेळ मजेत गेला असता.
पाहुण्यांच्या जेवणा-खाण्याची, त्यांच्या झोपण्याची व्यवस्था मंदानं पाहिली असती. मुख्य म्हणजे दार उघडणं, बंद करण्याचं काम तू बजावलं असतंस; पण मुलगा-सून नसताना आम्हा म्हाताऱ्यांकडे पाहुणे येणे म्हणजे सरळ सरळ संकटच! छप्पर गळकं असताना पाऊस येण्यासारखं! आम्ही दोघं कसं तरी आमचं म्हातारपण व आमचे आजार सांभाळतो. प्रसंगी म्हणजे प्रकृती साथ देत नसताना, आम्ही ब्रेड-बटरजॅम-दूध यावर दिवस घालवत असू; पण पाहुणे आले की साग्रसंगीत स्वयंपाक करणं आलं. यशोदा तिच्या-माझ्यापुरतं शिजवू शकते. पूर्ण स्वयंपाक करू शकत नाही. घरात दहा दुरूस्त्या निघतात. त्याकरिता सुतार, प्लंबर, टाइलवाला, गवंडी, इलेक्त्रिशिअन, टीव्हीवाला हे हवे असतात.।
(क्रमश:)
- भा. ल. महाबळ फोन : ०२२-२१६३१९४०