प्रेम महत्त्वाचं!

12 Apr 2020 13:19:06

 
 
मी मोकाशी हळहळलो, आपले विवाह झाले त्या काळात म्हणजे १९५९ च्या आसपास प्रेमविवाहाची पद्धत सर्रास हवी होती. प्रथम प्रेम, नंतर विवाह, पुन्हा प्रेम, प्रेमच प्रेम! मी प्रेमविवाहच केला असता. ओकांनी विचारलं, म तुमचा विवाह कधी झाला? १९५९ मध्ये. मोकाशी प्रेमविवाह करण्याचा हा अविचार तुम्ही मनात धरला असता तर तुम्ही ब्रह्मचारीच राहिला असता! आई- वडील, काका, मामा, आत्या, मावशी अशा तुमच्या नातेवाइकांनी पुढाकार घेतला, त्यांनी तुमची खात्री दिली म्हणून तुमचं लग्न झालं! का? का? मी खात्रीने प्रेमविवाहच केला असता! मोकाशी ठामपणे बोलले खरे, परंतु त्याचबरोबर वधूपक्षानं सर्व नातलगांना आपल्या संबंधात विचारलं होतं, नातलगांच्या शिफारशीमुळं आपलं लग्न झालं, हा ओकांचा अंदाज खरा ठरावा याचा मोकाशींना राग आला.
 
मोकाशी, मी तुमचा शाळाकॉलेजपासून मित्र आहे. तुम्ही कधीही एका मुलीशी चार शब्द बोलू शकला नाहीत. तुम्ही काय प्रेम करणार? बोलल्याशिवाय प्रेम जुळणार कसं? परब मोकाशींच्या मदतीला धावले, ओक, प्रेमाची तऱ्हाच  वेगळी आहे. ती तुम्हाला समजणार नाही. प्रेम करण्याकरिता बोलावे लागत नाही. तुकोबा म्हणतात, प्रेम न ये सांगता, बोलता, दाविता ।अनुभव चिता चित्त जाणे । तुका म्हणे बरे विचारावे मनी । आणिक भल्यांनी पुसो नये । ओक, प्रेम मनापासून करायचे असते, त्याकरिता सांगावे लागत नाही, बोलण्याची गरज नसते. ओक म्हणाले, परब, आपले मोकाशी १९५९ मधील स्त्री-पुरुषांमधील प्रेमविवाहाविषयी बोलत आहेत. तुमचे तुकोबा स्वत:च्या विवाहाविषयी बोलत आहेत का? तुकोबा म्हणतात ते त्यांच्या विठ्ठलाविषयीच्या प्रेमाबाबत. परब गडबडले व गप्प राहिले. ओक म्हणाले, ममोकाशी, प्रेमविवाह करण्याकरिता एकतर्फी  प्रेम पुरे नाही.
 
तुम्ही एक नाही दहा मुलींवर मनातल्या मनात प्रेम केलं असेल, पण उपयोग काय? प्रेमविवाह करण्यासाठी मुलीनं प्रतिसाद द्यायला हवा. मुलीनं आपल्यावर प्रेम करण्यासाठी आपल्यात काही तरी खास असावं लागतं. तुमच्यात असं खास काय होतं किंवा आजही आहे? वरती आपलं प्रेमप्रकरण घरच्यांना पसंत नसेल तर दोघा प्रेमिकांना घर सोडून पळावं लागतं. नव्या गावी, कोणाच्याही ओळखीशिवाय नोकरी मिळवावी लागते. राहण्यासाठी भाड्याने घर शोधावं लागतं. घरासाठी पागडीचे पैसे वडील देत नाहीत.फ मोकाशी एकदम ताळ्यावर आले. ते म्हणाले, ओक, प्रेमविवाह एवढा खडतर असतो? बरं घडलं, मी प्रेमविवाह केला नाही.फ उत्सुकतेनं मोकाशींनी संत परबांना विचारलं, ममाझ्या लग्नाचा विषय बाजूला ठेवा. तुमच्या लग्नाबाबत सांगा. परब म्हणाले, माझे वडील म्हणाले, गणू, तू लग्न कर. सदू शिंदेंची  सोयरा तुला योग्य आहे. तुझ्या आईला हाताखाली सून हवी. मी हो म्हणालो. शिंदेकाका व माझे वडील दोघेही दरवर्षी पंढरीच्या दोन्ही वाऱ्या करतात. परब उत्तरले.
(क्रमश:)                                                                                                                                                                                                                                                                                                                   
                                                                                                                                                             भा. ल. महाबळ
Powered By Sangraha 9.0