मरणसमयी परमात्म्याचे चिंतन कसे करावयाचे याचा खुलासा भगवंत करीत आहेत. डाेळ्यांनी जे पहायचे, कानांनी ऐकावयाचे, वाणीने बाेलावयाचे ते सर्व मीच आहे, असे समजल्यावर जीवाला कशाचेही भय उरणार नाही. भगवंत सांगतात की, मन व बुद्धी जर खराेखरच माझ्या ठिकाणी लावशील तर तू मलाच प्राप्त हाेशील असे मी तुला वचन देताे.अशी प्राप्ती कशी हाेईल? ही शंका घेण्यापूर्वी आधी तू अभ्यास कर व मग माझ्यावर ठपका ठेव.अभ्यासामुळे पांगळा मनुष्यदेखील पहाड चढून जाताे. त्याप्रमाणे नीट शास्त्रानुसार अभ्यास करून चित्त अखंडपणे परमेश्वराकडे लावावे.शरीर राहते किंवा जाते याचा विचार करू नये.अशा स्थितीत देहाची चिंता काेण करणार? नदीच्या रूपाने समुद्रात पाणी मिसळले की मागे वळून काेण पाहणार?
असे हे ज्ञानी पुरुष ज्या परब्रह्माला जाणतात ते नित्य उदित झालेले असते.ते आकारावाचून राहते. त्याला जन्ममृत्यू नसताे.ते आकाशाहून पुरातन व परमाणूहून सूक्ष्म असते.याच्यामुळेच सर्व जग निर्माण हाेते. मरणसमयी परब्रह्मच्या ठिकाणी चित्त स्थिर करून ध्यान कसे करावे हे भगवंत सांगतात. पद्मासन घालावे.उत्तरेकडे ताेंड करावे. क्रियायाेगाने परमेश्वराच्या प्राप्तीचा आनंद भाेगावा. प्राणवायूचा आकाशात प्रवेश करवावा.भक्तीने व धैर्याने, याेगबलाने त्याचे नियत्रंण करावे. मग प्राण, जड व चेतन यांची जाणीव नाहीशी हाेते. घंटेचा नाद जसा घंटेतच लय पावताे किंवा मडक्यात झाकलेला दिवा विझला तरी समजत नाही, त्याप्रमाणे देह सुटून प्राणाचा लय झाला तरी ध्यानात येत नाही. म्हणून ज्याला परमपुरुष म्हणतात. ताे माझेच रूप आहे. माझा भक्त या रूपात जाऊन स्थिरावताे.