गीतेच्या गाभाऱ्यात

    19-Mar-2024
Total Views |
 
 
 
 
bhagvatgita
 
पत्र एकाेणिसावे तुल्यनिन्दास्तुति: या लक्षणानंतर गीतेने माैनी हा शब्द वापरून फार माेठे औचित्य साधले आहे.तू आपल्या पत्रात लिहितेस - ‘‘गीतेचा पहिला अध्याय अर्जुनविषादयाेग आहे.यात अर्जुनाने आपले काही मुद्दे मांडले आहेत. ते मुद्दे काेणते? हे मुद्दे ऐकल्यानंतर लगेच कृष्णाने दुसऱ्या अध्यायात आपले तत्त्वज्ञान सांगणेस सुरवात का केली नाही, माझ्याप्रमाणे कितीतरी लाेकांना हा प्रश्न भेडसावत आहे.मी पुष्कळ टीका वाचल्या पण त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा टीकाकारांनी प्रयत्न केल्याचे माझ्या वाचण्यात नाही. तुम्ही कृपा करून त्या बाबतीत सविस्तर खुलासा करा.’’ गीता वाचून तू इतका सखाेल विचार करू लागलीस हे भाग्याचे लक्षण आहे.परमार्थाच्या प्रांतात माणसे जे प्रश्न विचारतात त्या प्रश्नांच्या स्वरूपावरून त्या माणसांची किंमत कळत असते.पहिला अध्याय शास्त्रप्रवृत्तिप्रस्ताव आहे. त्या अध्यायात अर्जुनाने नवरंगी मुद्दे मांडले आहेत.
(1) या युद्धामुळे कुलक्षय हाेईल.
(2) कुलक्षय झाला म्हणजे धर्म नष्ट हाेईल.
(3) मग अधर्माचा प्रादुर्भाव हाेईल.
(4) अधर्म माजला म्हणजे कुलस्त्रिया बिघडतात.
(5) स्त्रिया बिघडल्या म्हणजे वर्णसंकर हाेईल.
(6) वर्णसंकरामुळे कुलधर्म व जातिधर्म नष्ट हाेतील.
(7) मग लाेकांना नरकवास प्राप्त हाेईल.
(8) अशा तऱ्हेने आमच्या हातून महापाप हाेईल.
(9) यापेक्षा मला वाटते की मी जर शस्त्र टाकून दिले, व उलट प्रतिकार करण्याचे साेडून दिले आणि हातात शस्त्रे घेऊन काैरवांनी मला युद्धात ठार मारले तर माझे अधिक कल्याण हाेईल.
 
अर्जुनाचे हे नवरंगी मुद्दे आहेत.काही टीकाकारांना वाटते की अर्जुनाच्या इच्छेप्रमाणे भगवंतांनी त्याला भगवी वस्त्रे देऊन संन्यासी करणेस पाहिजे हाेते. हे म्हणणे बराेबर नाही.कितीतरी अहिंसावादी लाेक म्हणतात की - युद्ध सुरू झाले म्हणजे प्रतियुद्ध न करता निःशस्त्र सत्याग्रह करणे श्रेयस्कर असते व हे अहिंसावादी आवर्जून सांगतात की - युद्ध सुरू झाले म्हणजे आपण हातात शस्त्र घेऊ नये, उलट प्रतिकार करू नये व शस्त्र धारण करणाऱ्या शत्रूंनी अशा परिस्थितीत आपणास ठार मारले, तर आपण आदर्श अहिंसावादी ठरू.
 
त्या लाेकांच्या चष्म्यातून पाहिले, तर अर्जुन आदर्श अहिंसावादी ठरताे. ताे म्हणताे - यदि मामप्रतिकारमशस्त्रं शस्त्रपाणयः। धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्म क्षेमतरं भवेत् ।। जर मी प्रतिकार केला नाही, निःशस्त्र झालाे व हातात शस्त्रे घेऊन काैरवांनी युद्धात मला ठार मारले, तर माझे अधिक कल्याण हाेईल.अशा तऱ्हेने अर्जुन आदर्श अहिंसावादी झाला असता. कृष्णाने त्याला शाबासकी दिली नाही.अर्जुनाचे नवरंगी विचार ऐकून कृष्णाने लगेच त्याला तत्त्वज्ञान सांगण्यास सरुवात केली नाही. उलट असे दिसते की - हा आदर्श अहिंसावादी पाहून कृष्णाला राग आला.काहीही तत्त्वज्ञान न सांगता ताे अर्जुनास म्हणताे - असा षंढपणा करू नकाेस. हे तुला शाेभत नाही. हा क्षुद्र दुबळेपणा फेकून देऊन युद्धास उभा रहा