भक्त भगवंती अनन्य । त्यासी बुद्धी देताे आपण ।।1।।

    22-Sep-2023
Total Views |
 
 

saint 
 
या समासाच्या पूर्वार्धात देहातीत अवस्थेतही संत करीत असलेला कृपावर्षाव आणि सगुणभजनाची आवश्यकता सांगितल्यानंतर उत्तरार्धात श्रीसमर्थ हे भजन कसे काेणत्याही इच्छाप्राप्तीसाठी केलेले नसावे म्हणजेच निष्काम असणे कसे महत्त्वाचे आहे हे विशद करीत आहेत. निष्काम बुद्धीने केलेली उपासना केवळ दृढनिश्चयी व आत्मबलाचे सामर्थ्य असलेले साधकच करू शकतात.ही निष्काम भक्ती अशी सर्वाेत्तम आहे की, तिच्याशी तुलना हाेऊ शकेल अशी गाेष्टच त्रिभुवनात नाही. एखाद्या फळाच्या इच्छेने भक्ती केली तर ते फळ मिळते पण भगवंत अंतरताे पण निष्काम भक्तीने साक्षात भगवंताची प्राप्ती हाेते. तेव्हा क्षुल्लक इच्छा पूर्ण हाेणे आणि भगवंतप्राप्ती हाेणे यातील अंतर ओळखून भक्ताची भक्ती निष्कामच असली पाहिजे.
 
त्या भक्तीने जे सामर्थ्य प्राप्त हाेते ते त्रैलाेक्यात आगळेवेगळे असते. त्यापुढे भक्ती करून प्राप्त झालेल्या फळाचा काय पाड लागणार? आत्मज्ञान आणि निष्काम सगुण भक्ती जेव्हा भक्ताच्या ठायी एकत्रित हाेतात तेव्हा त्याला जे सामर्थ्य प्राप्त हाेते त्यापुढे कळिकाळाचीही मात्रा चालत नाही. हा संयाेग म्हणजे त्रिभुवनातील सर्वश्रेष्ठ मंगलयाेग आहे.असा सत्पुरुष सदैव हरिचिंतन, निरूपण व भजनकीर्तनात रंगून जाताे. त्यामुळे सहजपणेच त्याच्याकडे अनेक मुमुक्षू आकर्षित हाेतात. त्याच्या संगतीमुळे स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करू लागतात आणि हे महापुरुषही केवळ परब्रह्माच्या स्वानंदी एकांतात न राहता या भक्तांच्या कल्याणासाठी लाेकांतात येऊन त्यांना शिकवण देत राहतात.