पत्र एकाेणतीसावे गीतेच्या गाभाऱ्यात मला कळेल अशा तऱ्हेने तुम्ही जे सांगता त्यामुळे माझे जीवन उच्च, उदात्त व उत्तुंग हाेण्यास फार मदत हाेत आहे. तरी या खेपेत तुम्ही मला थाेड्नयात कृष्णचरित्र सांगा आणि माझे जीवनपुष्प सुगंधित करा.’ तुझा विचार चांगला आहे. गीता समजजून घेण्यास श्रीकृष्णाचे चरित्र समजून घेणे जरूर आहे. प्रभु रामचंद्र देवाचा अवतार हाेते, पण या अवतारात ज्ञानाचा उपदेश भगवानांनी स्वमुखाने केला नाही. श्रीकृष्णाने गीतेच्या रूपाने असा काही दिव्य उपदेश केला आहे की, इतका सर्वाेत्कृष्ट उपदेश आजपर्यंत काेणीच केलेला नाही. आज जगात जे ग्रंथ आहेत त्यामध्ये तत्त्वज्ञानाच्या प्रांतात पहिला मान अथवा अंगुलीस्थान गीताग्रंथाला दिले जाते. श्रीकृष्णाने जन्मभर जे तत्त्वज्ञान आचरून दाखवले त्याचे सार म्हणजे गीताग्रंथ.अशा परिस्थितीत गीताग्रंथ समजून घेण्यास श्रीकृष्णाचे जीवन समजून घेणे आवश्यक आहे.
मथुरेचे मूळचे नाव मधुपुरी असे हाेते, कारण ही नगरी मधु राक्षसाने वसवली हाेती. पुढे मधुचा पुत्र लवण यास रामाचा भाऊ शत्रुघ्न याने ठार मारले. श्रीकृष्णाचा जन्म हाेण्यापूर्वी उग्रसेन नावाचा राजा मथुरेत राज्य करत हाेता. याचे नाव उग्रसेन असले तरी स्वभावाने ताे फार साैम्य व दयाळू हाेता. साैम्यसेन हे नाव त्यास शाेभले असते. त्याचा पुत्र कंस हा मात्र फार उग्र व दुष्ट हाेता. सम्राट जरासंधाच्या दाेन मुली अस्ति व प्राप्ति या कंसास दिल्या हाेत्या. त्याने आपला बाप उग्रसेन यास कैद करून औरंगजेबाप्रमाणे राज्य बळकावले व ताे मन मानेल तसा वागू लागला.एकदा नारदाची स्वारी त्याच्याकडे आली व म्हणाली.‘हे म्हातारे लाेक गादीला चिकटून राहतात. तरुणांना वाव देत नाहीत. अशा परिस्थितीत तू आपल्या बापाला कैदेत टाकून राज्य बळकावलेस हे बरे केलेस.’ नारदाने केलेली ही स्तुती ऐकून कंसाला बरे वाटले व त्याने विचारले.
‘हे ठीक आहे, पण देवलाेकात माझ्या विरुद्ध काही कट तर शिजला नाही ना?’ नारद म्हणाले- ‘अरे, तेच सांगण्याकरता मुद्दाम मी तुझ्याकडे आलाे.वसुदेव देवकीचा आठवा पुत्र म्हणून प्रत्यक्ष विष्णू अवतार घेईल व ताे तुला ठार मारील.’ लगेच कंस म्हणाला- ‘देवकीचे सर्वच पुत्र मी ठार मारताे, म्हणजे आठवा काेठून माेजणेचा याबद्दल संशय नकाे. आठवा म्हणजे देव मला फसवू पहातील, पण देवकीचे सर्वच पुत्र मारून मीच देवास फसवताे.’ असे म्हणून हा हा हा असा कंसाने अट्टाहास केला.उग्रसेनाचा धाकटा भाऊ देवक याची मुलगी देवकी वसुदेवास दिली हाेती. वसुदेव हा जहागिरदार हाेता व त्याची जहागिरी गाेवर्धन पर्वताच्या जवळ हाेती. ज्याप्रमाणे काेल्हापूर हे संस्थान असताना तेथल्या जहागिरदारांचे वाडे काेल्हापुरास असत त्याप्रमाणे वसुदेव हा आपल्या जहागिरीच्या गावी राहात असला तरी त्याचा वाडा मथुरेला हाेता. कंसाने वसुदेव देवकीना या वाड्याच्या बाहेर जाण्यास बंदी केली. त्यांना तुरुंगात टाकले असे म्हणण्यापेक्षा त्यांना कंसाने स्थानबद्ध केले.