दिसणारे सर्व संपणारे आहे असे भगवंताने गीतेमध्ये सांगितले आहे ते सत्य आहे आणि म्हणूनच हे अगाेचर स्वरूप मात्र अविनाशी आहे. त्या स्वरूपाला रूप नाही, गुण नाही आणि ते दिसतही नाही म्हणून मग खरेच स्वरूप म्हणून काही आहे का आणि असेल तर त्याला कसे जाणावयाचे हा प्रश्न पडताे. स्वरूप सर्व चराचरात भरलेले आहे आणि केवळ तेच एक पूर्ण सत्य आहे. आकाश आपल्याला सर्वत्र पसरलेले दिसते पण ते वेगळेपणाने समजत नाही. तसेच हे स्वरूप सर्वव्यापी असूनही ते दिसत नाही. त्याला काही दृष्टांत किंवा उपमा दिली म्हणजे ते जाणण्याचा मार्ग सापडू शकताे. ते पाण्यामध्ये आहे; पण भिजत नाही, ते पृथ्वीमध्ये आहे पण झिजत नाही आणि अग्नीला व्यापून असूनही जळत नाही. चिखलातही ते असते पण बुडत नाही. वायूला व्यापूनही उडत नाही आणि साेन्यामध्ये असूनसुद्धा साेन्याप्रमाणे त्याचेपासून दागिने घडवता येत नाहीत.
यानंतर श्रीसमर्थ अतिशय महत्त्वाचे सूत्र सांगताना म्हणतात की, हे स्वरूप सर्वत्र भरलेले असले तरी त्याचा अनुभव घेणे सहजसुलभ नाही. जेव्हा आत्मज्ञान हाेते तेव्हा ज्ञानी ज्ञानात मिळूनच जाताे. त्यामुळे मी ब्रह्म आहे ही अभेदाची जाणीव करून घ्यायची म्हटले तर आपाेआपच अहंता अंगी आणावी लागते व मग ‘मी’पणामुळे आत्मज्ञानच लुप्त हाेऊ शकते. म्हणून त्याचा अनुभव जेव्हा येताे तेव्हा खरं तर अनुभवही अंतर्धान पावताे. मी ब्रह्म आहे हा सुद्धा अभिमानामुळे निर्माण हाेणारा भ्रम आहे, हे बारकाईने पाहिले तर कळेल. कल्पनेने आपल्याला ज्ञान हाेते आणि परब्रह्म तर कल्पनेच्या पलीकडे आहे त्यामुळे ते कल्पनेच्या मर्यादेत बसू शकत नाही. म्हणूनच मी ब्रह्म आहे ही कल्पना आहे आणि स्वरूप अपार आणि अनंत असल्याने ते याही कल्पनेच्या पार आहे. हे समजायला अवघड वाटले तरी सूक्ष्म विचार केल्यावर अहंभाव विसरल्यावर ते निश्चित समजेल असा विश्वासही श्रीसमर्थ देतात! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299