जी तूं त्रिजगतिये वाेलावा। अक्षर तूं सदाशिवा। तूंचि सदसत् देवा। तयाही अतीत तें तूं ।। 11.513

    02-Aug-2023
Total Views |
 
 

Dyaneshwari 
 
अर्जुनाचे मागील बाेलणे ऐकून खुणेनेच देव त्याला म्हणाले की, अर्जुना, या दाेन्ही सैन्यांचे आयुष्य संपले आहे असे मी तुला दाखविले.सर्व विश्वाचा मी संहार करीत आहे, असे काेठे म्हटले आहे? तरी ध्यानात ठेव की, उरलेले सर्व विश्व याेग्य काळी नाश पावणारच आहे. देवांचे हे बाेलणे ऐकून अर्जुनाने त्याच क्षणी पूर्वीप्रमाणे सर्व लाेक सुखरूप पाहिले. अर्जुन मनाशी म्हणायला लागला, देवा, तूच या जगाचा सूत्रधार आहेस. हे सर्व विश्व तूच मूळच्या स्थितीला आणले आहेस. दु:खसागरात पडलेल्या जीवांना तू सावरून धरताेस. ही तुझी कीर्ती मला आठवते. देवा, हे जग असल्यामुळेच ते तुझ्या ठिकाणी प्रीती धारण करीत आहे आणि तू दुष्टांचा नाश करीत आहेस.देवा, तूच या राक्षसांचे भय असल्यामुळे ते सर्व दाही दिशांना पळून जातात.
 
इतर सर्व विश्व म्हणजे सुर, सिद्ध, किन्नर, स्थावरजंगमात्मक जग हे सर्व आनंदभरित हाेऊन तुला नमस्कार करीत आहेत. श्रीकृष्णा, हे राक्षस काेणत्या कारणामुळे तुला शरण न येता पळून गेले आहेत? पण हे तुला काय पुसावे? माझ्या ध्यानात आले आहे. सूर्य उगवल्यावर अंधार कसा राहणार? आत्मप्रकाश हाेऊन तू प्रकट झाल्यामुळे या राक्षसांचा नाश हाेत आहे. तुझे हे सामर्थ्य आत्तापर्यंत माझ्या ध्यानात आले नाही.सर्व ब्रह्माला देवा, तुमची इच्छाच प्रसविली आहे. आपण सर्व विश्वाला व्यापून असून त्याचे राजे आहात. तू त्रैलाेक्याचा आश्रय आहेस. तू अविनाशी आहेस.देवा, सत् व असत् तूच आहेस. यापलीकडे जे काही आहे तेही तूच आहेस. देवा, प्रकृती व पुरुष यांचे मूळ तूच आहेस.तू महत्तत्त्व आहेस. तू जन्मरहित व सर्वांच्या पूर्वीचा आहेस.