उपाधी नस्तां आकाश । परब्रह्म तेंचि निराभास ।।2।।

    17-Aug-2023
Total Views |
 
 

saint 
म्हणजेच जाणतेपणाने, हेतूपूर्वक झालेली हालचाल म्हणजेच जाणीव हा सत्वगुणाचा प्रत्यय हाेय. गुरूवर्य बेलसरे यांनी याचे विवेचन करताना श्रीसमर्थांची तुलना उत्क्रांतवादी विचारवंतांशी केली असून, हे जाणते चळण म्हणजेच आधुनिक विचारसरणीतील ‘‘पर्पजुल मूव्हमेंट’’ मानली आहे. ही पंचमहाभूते वेगवेगळी वाटतात; पण अनेकदा एकरूपही हाेतात. त्यात काही तत्त्वज्ञ हे माेठे ते लहान असा भेद करतात, पण ताेही श्रीसमर्थांना मान्य नाही.आकाशालाच काहीवेळा परब्रह्मस्वरूप मानतात, पण ती उपमा कशी याेग्य नाही हे श्रीसमर्थ मनाेज्ञ रीतीने सांगतात. जाणीव जेव्हा पिंडाला व्यापते तेव्हा ‘‘जीव’’ हाेते, तर विश्वाला व्यापते तेव्हा शिवस्वरूप हाेते. अमर्याद अगाध जाणीव म्हणजेच परब्रह्म आहे; परंतु आकाशाला दृश्यपणाची मर्यादा आहे.
 
आकाश अवकाशाला व्यापणारे पण भकास म्हणजे पाेकळी आहे हे अनुभवास येते. परंतु परब्रह्म ‘निराभास’ आहे आणि शिवाय ते शून्य नसून अविनाशी आहे. म्हणून श्रीसमर्थ म्हणतात की उपाधीविरहित आकाश असे ब्रह्मस्वरूप आहे. तिन्ही गुणांची लक्षणे व रूपे पाहिली की, सर्व दृश्य जगातील त्यांचे कर्तृत्व ध्यानी येते. प्रकृती त्रिगुण आणि पंचभूते यांच्या अनेकमार्गी मि श्रणातून अनेक वस्तू निर्माण करते.शिवाय प्रकृती विकारवंत असल्याने या तिच्या कराम तीतून ती कशाकशाची निर्मिती करेल याचा काय नेम सांगणार असे म्हणताना श्रीसमर्थ ‘‘विकारवंत तयाते । नेम कैचा ।। असा गंमतशीर शब्दप्रयाेग वापरून श्राेत्यांना पंचमहाभूते आणि त्रिगुणांच्या गुणरूपामध्ये व अजाेड सर्जनशीलतेमध्ये रंगवून टाकतात! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299