तेथ हरु म्हणे नेणिजे। देवी जैसे कां स्वरूप तुझें। तैसें हें नित्य नूतन देखिजे। गीतातत्त्व।। (1.71)

    06-Jul-2023
Total Views |

Dyaneshwari
 
ज्या भगवद्गीतेवर ज्ञानेश्वर निरूपण करीत आहेत, त्या ग्रंथाचा गाैरव करताना ज्ञानेश्वरांनी गीतातत्त्वाचा एक विशेष या ओवीत सांगितला आहे. श्राेत्यांना प्रार्थना करताना ज्ञानेश्वर म्हणतात की, गीतार्थाचा विचार हा बहुधा न समजणारा आहे.तरीसुद्धा ताे सांगण्याचे धैर्य तुमच्या सहाय्याने मी करीत आहे. एरवी सूर्यापुढे काजव्याच्या प्रकाशाचे महत्त्व ते काय? किंवा समजण्यास कठीण अशा गीता तत्त्वाचे विवरण म्हणजे क्षुद्र टिटवीने आपले सामर्थ्य न ओळखून समुद्राचे पाणी संपवून टाकण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. श्राेतेहाे, तुमच्यासमाेर बाेलणे म्हणजे तुमच्याहून माेठे असणे अगत्याचे आहे.पण ते मला जमण्यासारखे नाही तुमच्या बराेबरीचे असणे हेही शक्य नाही. गीतातत्त्व अमर्याद व तुम्ही सुजाण श्राेते; यामुळे मला बाेलणे अवघड हाेत आहे.
 
खरे म्हणजे अतिशय गंभीर व सूक्ष्म ब्रम्हतत्त्व व त्याचा आविष्कार हा गीतेचा विषय आहे. या गीतेचे चिंतन भगवान शिवशंकरही वारंवार करतात. ज्यांचे चिंतन इतरांनी करावे असे शंकर काेणाचे चिंतन करतात? या शंकेने पार्वतीने त्यांना एकदा विचारले, तेव्हा गीतार्थाची थाेरवी वर्णन करताना आश्चर्यचकित झालेल्या पार्वतीला शिवशंकर म्हणतात, ‘देवी पार्वती, गीतेला मीही पूर्णपणे जाणत नाही. कारण ती मला राेज नित्यनूतन वाटते.’ आणि हे नूतनत्च कसे आहे, हे पार्वतीला समजावे म्हणून महादेव तिला सांगतात.‘देवी, जैसे का स्वरूप तुझें। तैसें हें नित्य नूतन देखिजें। गीतातत्त्व।।’ पार्वती, तू जशी राेज मला नवीन वाटतेस, तसे हे गीतातत्त्व राेज नाना अर्थ प्रकट करून प्रकाश देत असते. म्हणून या गीतातत्त्वाचे मीही चिंतन करीत असताे.त्याचे नवीन अर्थ माझ्या ध्यानात येतात. असे महादेवांनी सांगितले, हे ज्ञानेश्वरांनी श्राेत्यांना नम्र भावनेने निरूपित केले.