पत्र बाविसावे मी आईला आणि तात्यांना नमस्कार करून देवघरांत गेलाे, कृष्णाला नमस्कार केला व म्हटलं - कृपाळू उदार माझा गीतेश्वर। नमस्कार माझा तया वारंवार।
*** असाे! बाकीचा मजकूर पुढील पत्रांत तुझा राम * * * पत्र तेविसावे प्रिय जानकी, पत्नी पतीवर प्रेम करते हे भाग्याचे लक्षण आहे; पत्नी परमार्थांच्या प्रांतात रस घेते हे परम भाग्याचे लक्षण आहे, आणि परमार्थांच्या प्रांतात ती रंगून गेली हे पराकाष्ठेच्या भाग्याचे लक्षण आहे.आता तू परमार्थांच्या प्रांतात रंगून गेली आहेस हे साेन्याहून पिवळे झाले आहे तू विचारतेस - ‘तुमचा आवडता सिद्धांत असा आहे की - संतांच्या जीवनात असा एक काळ असताे की त्यावेळी त्याला परमेश्वराच्या भेटीची आत्यंतिक तळमळ लागलेली असते.
माझी शंका अशी आहे की - तुकाराम, नामदेव यांच्या जीवनात असा काळ दिसताे. रामदासांची करुणाष्टके पाहिली म्हणजे त्यांच्या जीवनातदेखील असा काळ हाेता. त्याबद्दल शंका राहत नाही. निरनिराळ्या संतांच्या जीवनात असा काळ आहे, पण मला वाटते ज्ञानेश्वरांच्या जीवनात असा काळ नाही.
त्यांची ज्ञानेश्वरी पाहिली म्हणजे जिकडे तिकडे आनंदाची वाणी दिसते.काही विद्वान म्हणतात की ज्ञानेश्वरांच्या जीवनात ईश्वराच्या भेटीबद्दलचा आत्यंतिक तळमळीचा काळ आला नाही. झाडाला एकदम पक्व फळ लागावे तसे ज्ञानेश्वरांचे जीवन आहे.तुम्हाला काय वाटते? तुमचा आवडता सिद्धांत ज्ञानेश्वरांच्या बाबतीत खरा आहे का? परमार्थांच्या प्रांतात रंगून गेल्याशिवाय माणसाला असली शंका सुचत नाही. शंकेचे उत्तर देण्यापूर्वी असली शंका विचारल्याबद्दल प्रथम मी तुझे अभिनंदन करताे.तुझ्या शंकेचे उत्तर असे की, ज्ञानेश्वरांच्या जीवनातदेखील देवाच्या भेटीबद्दल आत्यंतिक तळमळीचा काळ आला हाेता. त्यांच्या जीवनात असा आत्यंतिक तळमळीचा काळ आलाच नव्हता व झाडाला एकदम पक्व फळ लागावे तसे त्याचे जीवन हाेते, हे काही विद्वानांचे मत बराेबर दिसत नाही.
ज्ञानेश्वरांचे तू अभंग वाच म्हणजे देवाच्या भेटीपूर्वी त्यांना किती तळमळ लागली हाेती ते तुला कळून येईल.कळत हाेते की देव जवळ आहे. पण भेट हाेत नव्हती. ते म्हणतात - परिमळाची धाव भ्रमर ओढी। तैसी तुझी गाेडी लागाे मज।। अविट गे माय विटेना। जवळी आहे परि भेटेना।। ज्ञानेश्वरांना देव भेटत नव्हता. त्या अवस्थेत ते म्हणतात की उघड्या पाठीवर हीव वाजते आहे. देव मला घाेंगडी केव्हा देईल? त्यांना देव भेटत नाही म्हणून त्रास हाेत हाेता. देवाच्या भेटीची घाेंगडी त्यांना पाहिजे हाेती.रात्रंदिवस वहातसे चिंता। केधवा घडाैता हाेईन मी।। खिरजट घाेंगडे फाटके ते कैसे। वेचले तैसे भाेगिजे गा।। वित्त नाही गाठी जीवित्या आटी।