अदृश्यास उपमा नसे । म्हणाेनि निरूपम ।।2।।

    04-Jul-2023
Total Views |
 
 
 
saint
 
वाऱ्यामुळे जेव्हा आवर्त निर्माण हाेते तेव्हा वस्तू हवेत गाेलाकार गतीने उडतात, तसेच म ायेमुळे दृश्य जीवनात विविध तरंग उमटतात.आकाशात जसे ढग येतात तसेच ब्रह्माच्या म ायेमुळे विश्व निर्माण हाेते आणि ढग पांगले तरी मूळ आकाश तसेच कायम असते, त्याचप्रमाणे दृश्य वस्तूंचा नाश झाला तरी ब्रह्म अविनाशीच स्थिर असते.आकाशाकडे पाहिले तर त्यात ढग हलताना दिसतात; पण ढग गेले तरी आकाश स्थिरच असते, तसेच परब्रह्मातून विश्व निर्माण झाल्याने परब्रह्म आदी आणि अंती कायमच असते.आपल्याला जे अनेक भास हाेतात; पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी नसते याची अनेक सुलभ उदाहरणेही देताना श्रीसमर्थ म्हणतात की, आकाशाकडे पाहिले तर ते निळे दिसते आणि डाेंगर लांबून पाहिले तर हिरवे दिसतात; परंतु आकाशाला निळा किंवा डाेंगरांना हिरवा रंग दिलेला नसताे. आकाश चाेहाेबाजूला छत्रीप्रमाणे टेकलेले दिसते; पण ते जगात काेठेही टेकलेले असेलच का?
 
ढगातून जाणारा पाैर्णिमेचा चंद्र पळताना दिसताे; पण प्रत्यक्षात ढगच पळत असतात. अगदी त्याचप्रमाणे मायारूप सृष्टीमुळे परब्रह्म सगुण झाले असे आपल्याला वाटते; परंतु ते प्रत्यक्षात निर्गुण निराकारच असते. पंचमहाभुतांमुळे विश्व निर्माण झाले आणि हीपंचमहाभूते बीजरूपाने परब्रह्मातूनच येतात हे जाणले पाहिजे. ब्रह्मातून माया निर्माण हाेणे व मायेने सृष्टीरूप घेणे हे नजरबंदीच्या खेळाप्रमाणे आहे असे सांगून श्रीसमर्थ म्हणतात की, नजरबंदीमुळे निर्माण केलेल्या वस्तू खऱ्याखुऱ्या वाटतात; पण ती बंदी संपली की, त्या वस्तूही अदृश्य हाेतात.त्याचप्रमाणे केवळ भ्रमामुळे मायारूप सृष्टी आणि त्यांतील वस्तू खऱ्या वाटतात. ब्रह्मज्ञान प्राप्त झाले की, हा भ्रम संपताे आणि हे सर्व दृश्य नाशवंत आहे. मूळ ब्रह्माचाच हा खेळ असून ते परब्रह्म मात्र अनादि अनंत आणि अविनाशी आहे हे समजणे म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त हाेणे हाेय आणि ते सद्गुरूच्या आशीर्वादाने निश्चित प्राप्त हाेऊ शकते! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299