स्वार्थ आवरल्याने परस्पर प्रेम वाढते

    22-Jul-2023
Total Views |
 
 
 
Gondavlekar
 
परस्परात प्रेम वाढविण्यासाठी काही गाेष्टी आवश्यक आहेत.एक, बारीकसारीक गाेष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थाेडी थाेडी सवलत ठेवावी; म्हणजे द्वेष वाटणार नाही. दुसरे, सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी.तिसरे, काेणतीही सूचना सांगायची झाली, तर त्या व्यक्तीविषयक न बाेलता नम्रतेने आणि गाेड शब्दात सांगावी. चाैथे, अत्यंत महत्त्वाची गाेष्ट, जीमध्ये या सर्वांचा बऱ्याच प्रमाणात अंतर्भाव हाेताे, अशी बाब म्हणजे स्वार्थाला आळा घालणे. आणि शेवटची, तितकीच महत्त्वाची गाेष्ट म्हणजे, विषयांवर सर्व बाजूंनी हल्ला चढविणे. बाहेरून इंद्रियांना वळण लावावे आणि आतून मनाला अनुसंधानात ठेवावे.
 
स्वार्थाला आळा घालणे म्हणजे, मी स्वतः जितका माझ्याकरिता आहे असे वाटते, त्याच्याहीपेक्षा जास्त मी दुसऱ्याकरिता आहे असे वाटणे हे हाेय; आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला मदत करते. आता स्वार्थाचा विचार करताना असे सहज वाटते की, मी कुठे स्वार्थी आहे? मी कुठे कुणाजवळ काय मागताे? पण एवढ्याने ‘स्वार्थदृष्टी नाही’ असे म्हणता येणार नाही.अहंकाराइतकाच स्वार्थ जबरदस्त आहे. त्याच्या मुळ्या इतक्या खाेल आणि सूक्ष्म असतात, की त्यांचा पत्ताच लागत नाही. स्वार्थ तीन प्रकारचा असू शकताे; कायिक, वाचिक आणि मानसिक.देहाला दुसऱ्यामुळे कष्ट न हाेतील इतक्या काळजीने वागणे याला कायिक स्वार्थ म्हणतात.
 
माझ्या बाेलण्याला सर्वांनी मान डाेलवावी, मी काेणाला काही कमी-जास्त बाेललाे तरी ते त्याने निमूटपणे सहन करावे, अशा तऱ्हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणता येईल. आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे, माझे विचार बराेबर आहेत अशी जाणीव इतरांनी ठेवावी, अशा तऱ्हेची आपली इच्छा, त्याला मानसिक स्वार्थ म्हणता येईल.आता, मी माझ्याकरिता जितका असेन, त्याहून जास्त मी दुसऱ्याकरिता आहे, असा विचार केला, तर असे दिसून येईल, की मी स्वतःला जेवढी सवड ठेवताे, तेवढीच किंवा त्याच्याहून थाेडी जास्त सवड दुसऱ्याला ठेवणे जरूर आहे.म्हणजेच, जे दुसऱ्याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही, ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत न करणे; आणि त्याच्याच उलट, जे दुसऱ्याने आपल्याला केले तर बरे वाटते तेच आपण दुसऱ्याच्या बाबतीत करावे, हेच जीवनाचे सार आहे आणि हाच खरा धर्म आहे.